इंग्लंडविरोधात राजकोट येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून भारताचा फिरकीपटू आर अश्विन याने माघार घेतली आहे. त्याच्या आईची प्रकृती बिघडल्याने त्याने तातडीने घरी, चेन्नईला प्रयाण केले आहे. त्याने कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याची ५००वी विकेट घेतली.
बीसीसीआयने पत्रक जाहीर करून याबाबत माहिती दिली. अश्विनने राजकोट येथे सुरू असलेल्या सामन्यात ३७ धावा केल्या आणि एक विकेटही घेतली. मात्र त्याला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. ‘रविचंद्रन अश्विनने कौटुंबिक वैद्यकीय आणीबाणीमुळे तत्काळ कसोटी संघातून माघार घेतली आहे. या आव्हानात्मक काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि संघ अश्विनला पूर्ण पाठिंबा देत आहे.
खेळाडू आणि त्यांच्या प्रियजनांचे आरोग्य आणि कल्याण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अश्विन आणि त्याचे कुटुंब या आव्हानात्मक काळात मार्गक्रमण करत असताना त्यांच्या गोपनीयतेचा आदर करावा. बोर्ड आणि संघ अश्विनला आवश्यक ती मदत करत राहतील. टीम इंडिया या संवेदनशील काळात चाहते आणि माध्यमांच्या समजूतदारपणाची आणि सहानुभूतीची अपेक्षा करते आहे,’ असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या पत्राची खातरजमा करत आश्विनची आई आजारी असल्याचे नमूद केले आहे.
हे ही वाचा:
अश्विनचे कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स
भाजपला माझा प्रामाणिकपणा दिसला म्हणून तिकीट मिळाले!
अयोध्या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाने जारी केले चांदीचे नाणे
अश्विनची संयत खेळी
अश्विनने राजकोट येथे दुसऱ्या दिवशी संयत खेळीचे दर्शन घडवले. भारताने दोन विकेट गमावल्यानंतर त्याने ध्रुव जरेलसोबत ७७ धावांची भागीदारी केल्याने भारताला ४०० धावांचा टप्पा गाठता आला. त्याने ३७ धावा केल्या. त्यानंतर त्याने झॅक क्रॉली याची विकेट घेतली आणि ५०० विकेट घेणारा दुसरा भारतीय ठरला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने दोन विकेट गमावून २०७ धावा केल्या होत्या. डकेटने ११८ चेंडूंत नाबाद १३३ धावांची खेळी केली आहे. सध्या इंग्लंड २३८ धावांनी भारताच्या पिछाडीवर आहे.