चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आयपीएल २०२५ मध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात मुंबई इंडियन्स (एमआय) विरुद्ध करणार आहे. हा सामना खास असणार आहे, कारण दोन्ही संघ पाच-पाच वेळा चॅम्पियन राहिले आहेत. मात्र सर्वांचे लक्ष महेंद्रसिंग धोनीवर असणार आहे, जो अजूनही या स्पर्धेतील महत्त्वाचा खेळाडू आहे.
धोनी यंदाच्या हंगामात खेळणार का याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते, पण भारतीय क्रिकेटचे दिग्गज सुनील गावसकर यांनी स्पष्ट केले की, “जेव्हा जेव्हा लोकांनी धोनीच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले, तेव्हा त्याने आपल्या खेळाने त्यांना गप्प केले.”
धोनी जुलैमध्ये ४४ वर्षांचा होणार असून हा त्याचा सलग १८वा आयपीएल हंगाम असेल. यातील १६ हंगाम तो सीएसकेसाठी खेळला आहे. त्याने आतापर्यंत २६४ सामन्यांत ५२४३ धावा केल्या असून तो आयपीएलच्या सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर २४ अर्धशतकांची नोंद आहे.
सुनील गावसकर यांनी जिओहॉटस्टारवरील चर्चेत सांगितले, “आपण धोनीवर दबाव का टाकावा? जेव्हा जेव्हा लोकांनी त्याच्या क्षमतेवर शंका घेतली, त्याने अप्रतिम कामगिरीने उत्तर दिले. या वयातही तो नेट्समध्ये सहज षटकार मारतो. त्याच्यासाठी वय ही फक्त एक संख्या आहे.”
रविवारी जेव्हा धोनी मुंबई इंडियन्सविरुद्ध मैदानात उतरेल, तेव्हा सीएसकेसाठी २५० षटकार पूर्ण करण्यासाठी त्याला फक्त दोन षटकारांची गरज असेल. धोनीने सीएसकेचे नेतृत्व करताना २१२ सामन्यांत संघाला १२८ विजय मिळवून दिले आहेत, तर ८२ सामन्यांत पराभव स्विकारावा लागला आहे.
आयपीएल इतिहासात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत धोनी चौथ्या स्थानावर आहे. त्याच्या पुढे क्रिस गेल (३५७), रोहित शर्मा (२८०) आणि विराट कोहली (२७२) आहेत.
धोनी २००८ पासून सीएसकेसोबत आहे आणि त्याने संघाला पाच वेळा चॅम्पियन बनवले आहे. मात्र, २०१६ आणि २०१७ मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे संघ निलंबित झाल्याने तो काही काळ संघापासून दूर राहिला होता. गेल्या वर्षी आयपीएल मेगा लिलावात सीएसकेने त्याला अनकॅप्ड खेळाडू म्हणून संघात स्थान दिले, कारण तो गेल्या पाच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे.
माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मॅथ्यू हेडन यांनी मुंबई आणि चेन्नई यांच्यातील या सामन्याला ‘एल क्लासिको’ असे म्हटले. ते म्हणाले, “ही दोन्ही संघ आयपीएल इतिहासातील सर्वात मोठे प्रतिस्पर्धी आहेत. चेन्नई आपल्या चेपॉकच्या मैदानावर मुंबईवर वर्चस्व गाजवते, जसे मुंबई वानखेडे स्टेडियममध्ये सीएसकेला नामोहरम करते.”
हेही वाचा :
“जर मार बसला, तर फक्त चांगल्या चेंडूवरच बसावा” – कुणाल पांड्या
पंजाबचे जिल्हाप्रमुख मंगतराम मंगा यांच्या कुटूंबियांना शिवसेनेकडून १० लाखांची मदत सुपूर्द!
१० वर्षात भारताचा जीडीपी दुप्पट
कर्नाटक : १५० फुटी रथ कोसळून एका भाविकाचा मृत्यू!
या दोन संघांमध्ये आतापर्यंत ३७ सामने झाले आहेत, ज्यात मुंबईने २० आणि चेन्नईने १७ सामने जिंकले आहेत. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या एकमेव सामन्यात सीएसकेने मुंबईचा २० धावांनी पराभव केला होता.
हेडन पुढे म्हणाले, “या सामन्यात सीएसकेची फिरकी गोलंदाजी महत्त्वाची भूमिका बजावेल, विशेषत: संघाचे माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन पुन्हा संघात परतले आहेत. चेपॉकची खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करू शकते.”