पुलवामा घटनेनंतर भारताच्या मुत्सद्देगिरीमुळे पाकिस्तानला त्यांच्या दहशतवादाच्या धोरणात कसा बदल करावा लागला, याची रंजक कहाणी नुकतीच समोर आली आहे. पुलवामा घटनेनंतर भारताची नऊ क्षेपणास्त्रे पाकिस्तानच्या दिशेने कधीही डागली जातील, अशी परिस्थिती होती. मात्र पाकिस्तान सरकारने परिस्थिती निवळावी यासाठी मध्यरात्री तत्कालीन भारतीय उच्चायुक्त अजय बिरासिया यांचे दार ठोठावले आणि पंतप्रधान मोदी व इम्रान खान यांचा संवाद घडवण्याची विनंती केली. मात्र मोदी यांनी तो फोन घेतला नाही.
या रात्रीचे वर्णन नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कत्ल की रात’ असे केले होते. ती रात्र होती २७ फेब्रुवारी, २०१९ची. भारत-पाकिस्तानमध्ये हवाई संघर्ष झाल्यानंतर पकडला गेलेला भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्थमान याने पाकिस्तानच्या कैदेत पहिली रात्र घालवली होती. दोन दिवसांनंतर अभिनंदनची सुटका झाली होती. त्या रात्री काय घडले, याबाबत अनेकांना उत्सुकता होती. या सर्व उत्सुकतेने ओतप्रोत भरलेले क्षण बिसारिया यांनी पुस्तकात एकत्र केले आहेत, त्यात भारताच्या मुत्सद्देगिरीची चुणूक दिसते. ‘अँगर मॅनेजमेंट: द ट्रबल्ड डिप्लोमॅटिक रिलेशनशिप बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान’ या पुस्तकात याबाबत विस्तृत माहिती आली आहे.
त्या मध्यरात्री बिसारिया यांना पाकिस्तानचे भारतीय उच्चायुक्त सोहेल मेहमूद यांचा फोन आला. तेव्हा त्यांनी इम्रान खान यांना मोदी यांच्याशी बोलायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर बिसारिया यांनी दिल्लीतील माणसांशी संपर्क साधला आणि मेहमूद यांना सांगितले की, मोदी त्या क्षणी उपलब्ध नाहीत आणि काही तातडीचा संदेश असल्यास ते उच्चायुक्तांना सांगू शकतात, असे सांगितले. मात्र मेहमूद यांनी त्या रात्री परत त्यांना फोन केला नाही.दुसऱ्या दिवशी २८ फेब्रुवारी रोजी इम्रान खान यांनी अभिनंदन याची मुक्तता करण्याचा निर्णय संसदेत जाहीर केला. तेव्हा त्यांनी शांततेसाठी मोदी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले मात्र त्याबाबत तपशीलात सांगण्यास नकार दिला.
हे ही वाचा:
‘ईजमायट्रिप’ने स्थगित केल्या मालदिवच्या सर्व विमानाचे बुकिंग!
२२ जानेवारीला आसाममध्ये ‘ड्राय डे’
रामलल्लाच्या सोहळ्याला जाणाऱ्या भाविकांसाठी मुस्लिम कुटुंब बनवत आहे ‘राम नावाच्या टोप्या’!
अवैध खाणकाम प्रकरणी लोकदलचे माजी आमदार दिलबाग सिंग अटकेत
पाकिस्तानने भले हे पाऊल शांततेसाठी उचलल्याचे सांगितले. मात्र भारत आणि पाकिस्तानमधील अमेरिका व ब्रिटनचे उच्चायुक्त तेव्हाही भारतीय वैमानिकाच्या जिवाला धोका निर्माण झाल्यास परिस्थिती चिघळेल, अशी धमकी भारताने दिल्यामुळेच हे घडल्याचे मान्य करतात. पाकिस्तान तेव्हा घाबरला होता. २६ फेब्रुवारीला यापैकी अनेक उच्चायुक्तांना पाकिस्तानने चर्चेसाठी बोलावले होते. त्यानंतर या उच्चायुक्तांनी भारताच्या परराष्ट्र सचिवांना रात्रीतच फोन करून पाकिस्तान केवळ अभिनंदन यांची सुटका करण्यास तयार नाहीत तर, भारतातील पुलवामा येथे घडलेली घटना आणि दहशतवादावर बोलण्यासही तयार आहेत, हा संदेश कळवला होता. खान हे याबाबतची घोषणा दुसऱ्या दिवशी संसदेत करतील, असेही त्यांनी सांगितले होते.
वेगवान लष्करी कारवाईचा इशारा देताना मोदींनी २०१९ मध्ये निवडणूक रॅलीत सांगितले होते की, पाकिस्तानने सुदैवाने पायलटला सोडले नाहीतर ‘कत्ल की रात’ झाली असती. अभिनंदनच्या सुटकेसाठी पाकिस्ताच्या दिशेने क्षेपणास्त्रे रोखली होती असे भारताने अधिकृतपणे कधीच म्हटले नाही, परंतु या क्षेपणास्त्राच्या धोक्याने लष्कर आणि इम्रान खान यांचे सरकार खचले होते, असे बिसारिया यांनी उघड केले. अभिनंदन यांना पकडल्यानंतर परराष्ट्र मंत्री तेहमीना जंजुआ यांनी २७ फेब्रुवारी रोजी अमेरिका, ब्रिटन आणि फ्रेंच राजदूतांना भारताच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बोलावले होते. संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास, जंजुआ यांनी लष्कराचा संदेश वाचला.
भारताने पाकिस्तानच्या दिशेने नऊ क्षेपणास्त्रे रोखली असून ते ती कधीही डागू शकतात, असे लष्कराने त्यात नमूद केले होते. त्यानंतर जंजुआ यांनी या राजदूतांना ही ‘विश्वासार्ह माहिती’ त्यांच्या राजधानीत कळवावी आणि भारताला असे करण्यास रोखावे, अशी विनंती केली. यातील एका राजदूताने याबाबत थेट भारतासोबत बोलण्यास सांगितले. त्यानंतर काही वेळातच भारतीय प्रभारी उच्चायुक्तांनाही बोलावण्यात आले. अर्थातच खान यांनी मोदींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. एका पाश्चात्य उच्चायुक्तांनी नंतर बिसारिया यांना सांगितले की, भारताच्या कृतीने भारताविरुद्ध प्रॉक्सी दहशतवाद पसरवण्याच्या प्रकारावर पुनर्विचार करण्यास पाकिस्तानला भाग पाडले आहे.
पाकिस्तान याबाबत गांभीर्याने विचार करतेय, याचा सर्वांत मोठा पुरावा काही महिन्यांनंतर आला. आयएसआयशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीने बिसारिया यांना पहाटे दोन वाजता फोन कॉल करून अल कायदा ही दहशतवादी संघटना त्यांचा सदस्य झाकीर मुसा याच्या हत्येचा बदला घेणार असल्याचा इशारा दिला. मुनीर यांच्या नेतृत्वाखालील आयएसआयला याबाबत भारतीय उच्चायुक्तांना कळवायचे होते. त्यामुळे अल कायदाच्या या हल्ल्याची अंदाजित वेळ आणि ठिकाण काय असेल, याची पक्की खबर भारताला देण्यात आली. बिसारिया यांच्या मते, अशी खबर देणे म्हणजे पाकिस्तानला दुसरा पुलवामा घटना घडण्यास नको होते किंवा लष्करप्रमुख बाजवा त्या वर्षी जूनमध्ये होणाऱ्या शिखर परिषदेपूर्वी दोन्ही देशांमधील वातावरण सुधारण्यासाठी काम करत होते, याचा तो परिणाम होता.