मुंगेरीलाल के हसीन सपने ही टीव्ही मालिका काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाली होती. लोकांनी या मालिकेला डोक्यावर उचलून धरले होते. काँग्रेसने महाराष्ट्रात आपली सत्ता स्वबळावर येणार असे म्हटल्यानंतर आता याच मालिकेचा पुढील भाग लवकरच येतो की काय अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. पटोले यांनी एवढ्यावरच न थांबता कोकणात एकही आमदार नाही, तिथे देखील येत्या काळात काँग्रेसचे आमदार निवडून येतील असा दावा केला आहे. काँग्रेस पक्षाचा शिपाई म्हणून काम करा, असेही नाना पटोले यांनी म्हटलेले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खोचक टोला लगावला आहे. पटोलेंचा हा दावा म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार असल्याचे ते म्हणाले.
अर्थात, स्वप्ने कुणीही पाहू शकतो, अगदी पंतप्रधान, मुख्यमंत्री होण्याचीही स्वप्ने पाहणे, तशी जाहीर घोषणा करणे यात काहीही वावगे नाही. पण हे करताना वास्तवाचेही भान असलेच पाहिजे. एकूणच देशभरात, महाराष्ट्रात काँग्रेसची काय स्थिती आहे याचे भान पटोले यांना आहे की नाही ठाऊक नाही.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक, जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत काँग्रेसची पार धूळधाण उडाली. मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीय. तरीही पटोले ही अशी विधाने बिनधास्त कशी काय करतात कुणास ठाऊक?
बरे हे आरोप करताना महाविकास आघाडीचा विचार तरी पटोले यांनी केला आहे अथवा नाही, त्या आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, त्यांचा तरी विचार स्वबळाची भाषा करताना केला आहे की नाही, हा प्रश्न निर्माण होतो.
एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर मविआ सरकार कोसळले. ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रिक्षावाला म्हणून हिणवत होते, त्यांनीच मविआच्या तीन चाकी रिक्षाला ब्रेक लावले. एकनाथ शिंदेबरोबर ४० आमदार आणि १२ खासदारांनी भाजपाबरोबर जाऊन सत्ता स्थापन केली. जोपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत हे आमदार होते, तोपर्यंत उद्धव ठाकरेंना किंमत होती. पण हे आमदार सोडून गेल्यावर शिवसेनेची ताकद या पातळीवर आली आहे की, तोळा मासा झालेली काँग्रेससुद्धा उद्धव ठाकरेंना किंमत द्यायला तयार नाही, असेच पटोले यांच्या विधानावरून दिसते आहे.
पटोले एकीकडे स्वबळाची भाषा करत असताना आणि आपली स्वतंत्र चूल मांडण्याची स्वप्ने पाहात असताना उद्धव ठाकरे यांचा गट मात्र काँग्रेसशी लगट करण्याचा प्रयत्न करतोय. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या गांधी घराण्याविरुद्ध नेहमीच आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्रात येऊन राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली त्या राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत बाळासाहेबांचे वारसदार म्हणणारे आदित्य ठाकरे सामील झाले. जर काँग्रेससोबत जाण्याची वेळ आली तर मी माझे शिवसेना हे दुकान बंद करीन, असे बाळासाहेबांनी म्हटले होते. मात्र, आज हेच बाळासाहेबांचे वारसदार काँग्रेससोबत यात्रेत चालत आहेत. बाळासाहेबांचा विचार हा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेससोबत न जाण्याचा होता. आदित्य ठाकरेच नव्हे तर त्यांच्यानंतर विश्वप्रवक्ते संजय राऊतही आता पदयात्रेत सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे सहकारी खासदारही सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत पहिल्यांदाच राहुल गांधींची गळाभेट होणार आहे. पण हा विरोधाभास आहे. पटोले स्वबळाबद्दल बोलत आहेत तर उद्धव ठाकरे गट काँग्रेसशी अधिकाधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो आहे.
एवढेच नव्हे तर उद्धव गटातील नेते व्यक्तीगत पातळीवर आणि आपले मुखपत्र असलेल्या सामनातून काँग्रेसवर स्तुतीसुमने उधळत आहेत. अग्रलेखातून राहुल गांधींचे भरभरून कौतुक होत आहे. काँग्रेस संघटनेला संजीवनी मिळेल, हा येणारा काळ ठरवणार आहे, अशी आशा वर्तमानपत्रातून दाखविली जात आहे. या भारत जोडो यात्रेवर भाजपचे नेते टीका करत आहेत, त्या टीकेला काँग्रेसच्या नेत्यांऐवजी पुढे येऊन हिरीरीने शिवसेनेचा ठाकरे गट सामनाच्या अग्रलेखातून भूमिका मांडतो आहे. काँग्रेस मात्र इतक्या तुष्टीकरणानंतर, लोणी लावल्यानंतरसुद्धा उद्धव ठाकरेंकडे कानाडोळा करत आहे. हे उद्धव ठाकरे यांना ठाऊक नसेल का? की त्यांची आता ही मजबुरीच होऊन बसली आहे?
हेही वाचा :
भाजपमध्ये प्रवेशाचे बॉम्बस्फोट होणार
महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबरोबर आमदार गेल्यानंतर उद्धव ठाकरेंकडे हाताने मोजता येतील एवढेच काय ते आमदार, खासदार उरलेत. त्यांच्याकडे पूर्वीसारखी ताकद आता उरलेली नाही. काँग्रेसचीही अगदी हीच अवस्था आहे. डबघाईला आलेल्या काँग्रेसला खरेतर २०१९मध्ये कोणतीही संधी नव्हती पण उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली. मतदारांनी काँग्रेसला त्यांची जागा दाखवून दिली होती, परंतु उद्धव ठाकरे यांचा स्वार्थ काँग्रेसच्या मदतीला धावून आला. पण आता उद्धव ठाकरे यांच्या खिंडार पडलेल्या पक्षामुळे आपल्याला कोणताही फायदा होणार नाही, हे काँग्रेसने पुरते जाणले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना ते दूर लोटण्याच्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरे यांची ही दुर्बल स्थिती आता काँग्रेसच्या लक्षात आली आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यानी राहुल गांधी यांना किती गुळ लावला तरी काँग्रेसवाले यांना काही आता फार मनावर घेतील, असे आता दिसत नाही. त्यामुळे नाना पटोले स्वबळाची भाषा करतात तेव्हा त्यात उद्धव ठाकरे गटाला वस्तुस्थितीचे दर्शनच घडविले आहे.