दिल्लीकडे येणारी पंजाब मेल अचानक रेवाडी कडे वळवण्यात आली. त्यावरून गहजब उडाल्यानंतर रेल्वेने या प्रकाराला तांत्रिक अडचण म्हटले आहे.
“काही तांत्रिक अडचणीमुळे ही गाडी वळवावी लागली” अशी माहिती उत्तर रेल्वेचे प्रवक्ते दिपक कुमार यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिली आहे. मात्र याबाबत आणखी कोणताही खुलासा त्यांनी केला नाही. आणखी एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील स्थानके असलेल्या रोहतक आणि शाकुर बस्ती या स्थानंकांदरम्यान ओव्हर हेड वायमध्ये बिघाड असल्यामुळे ही गाडी वळवावी लागली.
या प्रकारावरून सोशल मिडीयावर गहजब उडाला आहे. पंजाबमधून दिल्लीतील आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी ही गाडी वळवण्यात आली असा अंदाज बांधला जात आहे.
पंजाब मेल ही भारतातील काही जुन्या मोजक्या गाड्यांपैकी एक आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- फिरोजपूर जाणारी ही गाडी रेल्वेच्या महत्त्वाच्या गाड्यांपैकी आहे. ही गाडी मुंबईकडे येताना रोहतकच्या बाजूने दिल्लीत शिरते. त्यानंतरचे पुढचे स्थानक नवी दिल्ली आहे. मात्र आज तसे न घडता ही गाडी थेट रेवाडी स्थानकाच्या दिशेने वळली आणि तिने मुंबईकडचा आपला प्रवास चालू केला.