राजकीय पक्षांवर लक्ष ठेवा नाही तर देश लुटला जाईल!

.नागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधानाचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवाहन

राजकीय पक्षांवर लक्ष ठेवा नाही तर देश लुटला जाईल!

कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सत्तेत असलेले राजकीय पक्ष सरकारी निधी देशाच्या विकासासाठी वापरतात की त्यांच्या पक्षाच्या विस्तारासाठी? की व्होट बँक तयार करण्याच्या प्रयत्नात त्याची लूट करतात या प्रश्नांचा विचार जरूर करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशभरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधताना केले.

नागरी सेवा दिनानिमित्त नवी दिल्लीत नागरी सेवकांना मार्गदर्शन करतांना पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रउभारणीत आपली भूमिका वाढविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. पंतप्रधान म्हणाले, सत्तेवर आलेला राजकीय पक्ष करदात्यांच्या पैशाचा वापर आपल्या पक्षाच्या फायद्यासाठी करतो की देशाच्या हितासाठी? ते कुठे वापरले जात आहे?, स्वत:ची व्होट बँक तयार करण्यासाठी सरकारी पैसा लुटतोय की सगळ्यांचे जगणे सुसह्य करण्याचे काम करतोय…? राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांची विविध संघटनांमध्ये नियुक्ती करत आहे की सर्वांना पारदर्शकपणे काम मिळण्याची संधी देतोय? काळ्या पैशाचे नवे मार्ग आपल्या मालकांसाठी निर्माण व्हावेत म्हणून राजकीय पक्ष धोरणांमध्ये बदल करत आहेत का? कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही या प्रश्नांचा विचार केला पाहिजे असे आवाहन पंतप्रधांनी यावेळी बोलतांना केले.

सरदार पटेल नागरी सेवकांना ‘स्टील फ्रेम ऑफ इंडिया’ म्हणत. तुम्हाला त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील. अन्यथा देशाची संपत्ती लुटली जाईल, करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी होईल आणि देशातील तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा होईल असे सांगून मोदी म्हणाले लोकशाहीत प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतःची विचारधारा असते आणि घटनेने प्रत्येक पक्षाला हा अधिकार दिला आहे, मात्र सरकारी कर्मचारी म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काही प्रश्नांची काळजी घेणे आवश्यक आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आमच्याकडे वेळ कमी पण क्षमता जास्त

आज भारतातील प्रत्येक नागरी सेवा अधिकारी भाग्यवान आहे. त्यांना देशाच्या अमृतकाळात देशसेवेची संधी मिळाली. आपल्याकडे कडे वेळ कमी आहे पण आपल्यात भरपूर क्षमता आहे, आमचे ध्येय अवघड असले तरी हिंमत कमी झालेली नाही. आपल्याला पर्वतासारखे चढावे लागेल पण आमचे ध्येय आकाशापेक्षा उंच आहे असा अभिमान पंतप्रधांनी यावेळी व्यक्त केला.

हे ही वाचा:

पायलटने चक्क मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बोलावले, चौकशी सुरू

टीका भोवली.. संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल

पाकिस्तानात विकत आहे, विदेशी शस्त्रांच्या ‘फर्स्ट कॉपी’ अगदी स्वस्तात!

सावरकरांची बदनामी करण्याची काँग्रेसची मोहीम

गरीबातल्या गरीबालाही सुशासनाचा विश्वास मिळाला

गेल्या नऊ वर्षात देशातील गरिबातील गरीबाला तुमच्या मेहनतीमुळे सुशासनाचा विश्वास मिळाला. गेल्या ९ वर्षांत भारताच्या विकासाला नवी गती मिळाली असेल, तर तुमच्या सहभागाशिवाय ती शक्य नव्हती. कोरोनाचे संकट असूनही, आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, अशा शब्दात पंतप्रधांनी नागरी सेवा अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

Exit mobile version