क्रीडा क्षेत्राच्या प्रेमींसाठी आज एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. प्रसिद्ध ऍथलिट पीटी उषा यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या पीटी उषा ह्या पहिल्या महिला आहेत. पीटी उषा यांनी खेळाडू असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर जबरदस्त यश मिळविले होते. या पदावर निवड झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री किरन रिजिजू यांनी त्यांचे अभिनंदन केले. किरन रिजिजू हे पहिले क्रीडा मंत्री राहिलेले आहेत. पीटी उषा ह्यांनी ह्या पदासाठी नामांकन दिले आहे अशी माहिती त्यांनी स्वतः दिली होती. पीटी उषा यांच्याव्यतिरिक्त अन्य कुणीही अध्यक्षपदासाठी दावा केला नाही. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. पीटी उषा, अध्यक्षपदी निवड होण्यापूर्वी २६ नोव्हेंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर म्हणाल्या, “माझे सहकारी खेळाडू आणि राष्ट्रीय महासंघांच्या सहकार्य आणि पाठिंब्याने आयओए अध्यक्षपदासाठी माझं नामांकन दाखल करताना मला अभिमान वाटत आहे “.
भाजपने या वर्षी जुलैमध्ये पीटी उषा यांना राज्यसभा सदस्य म्हणून नामांकित केले होते. आयओए निवडणुकीबाबत तपशील देताना निवडणूक अधिकारी उमेश सिन्हा यांनी सांगितले की, २५ आणि २६ नोव्हेंबरला कोणीही अर्ज भरले नाही. परंतु २७ नोव्हेंबरला २४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आणि पीटी उषा ह्यांची निवड झाली. पीटी उषा ह्या भारताच्या सर्वात उत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहेत. त्यांनी लॉस एंजेलिस १९८४ च्या ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत ५५.४२ सेकंदामध्ये पूर्ण करत यश मिळविले होते. आजपर्यंत त्यांचा हा विक्रम कुणीही मोडला नाही आणि अजूनही अबाधित आहे.