बदलापूर बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे नुकताच पोलिसांच्या एन्काउंटर ठार झाला. चौकशीसाठी नेत असताना आरोपीने पोलिसांची बंदूक ओढून गोळ्या झाडल्या, ज्यामध्ये एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याच्या पायाला गोळी लागली. संरक्षणार्थ पोलिसांनीही आरोपीवर गोळ्या झाडल्या त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत अक्षयच्या कारनाम्यामुळे बदलापूरमधल्या नागरिकांनी त्याच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी देणार नसल्याचे घोषित केले. विरोध होत असल्याचे पाहताच मृत अक्षयच्या कुटुंबीयांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. मुलाच्या अंत्यविधीसाठी सुरक्षा देण्याच्या मागणी या पत्राद्वारे कुटुंबीयांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत अक्षयच्या कुटुंबीयांनी सुरक्षा देण्याच्या मागणीचे पत्र न्यायालयात दिले आहे. मृत मुलाच्या अंत्यविधीसाठी सुरक्षा द्यावी, असे पत्रात म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री शाह आणि राज्याचे गृहमंत्री फडणवीस आणि ज्या मंत्र्यांकडे संरक्षणाचे अधिकार आहेत, त्यांच्याकडून सुरक्षेची मागणी कुटुंबीयांनी पत्राद्वारे केली आहे. मृत अक्षयची बाजू लढणाऱ्या सरकारी वकिलांनी देखील यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, कुटुंबियांना सुरक्षा दिली पाहिजे, यापूर्वीही कुटुंबांवर हल्ला झाला होता, त्यामुळे पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी त्यांना सुरक्षा द्यावी. कायद्यापुढे सर्व नागरिक समान असल्याचेही वकिलांनी सांगितले.
हे ही वाचा :
झाशीच्या राणीच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या वक्फ बोर्डाचा प्रयत्न हाणून पाडला!
संजय राऊत म्हणतात, न्यायालयांचे संघीकरण झाले!
मेधा सोमय्या म्हणाल्या, ‘आजचा दिवस वेगळ्याचं पहाटेने उजाडला, परिवाराला न्याय मिळाला’
राहुल गांधी भारताचे की ब्रिटनचे नागरिक; उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्न
दरम्यान, मृत अक्षय शिंदेचा मृतदेह कळव्यामध्ये दफन करण्यास मनसेने विरोध केला आहे. मृतदेह दफन करण्यासाठी कुटुंबाने जागा शोधून आम्हाला कळवावी असे पोलिसांनी मृत अक्षयच्या कुटुंबियांना सांगितले होते. यानंतर कळव्यामध्ये आरोपीचे कुटुंब जागा शोधत असल्याची माहिती मनसेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मृतदेह दफन करण्यास विरोध करत याबाबत कळवा पोलीस ठाण्यास पत्र दिले.