जम्मू काश्मीर येथे हिंदू यात्रेकरूंवर जिहादी पाकिस्तानी आतंकवाद्यांनी हल्ला करून १० यात्रेकरूंची हत्या केली त्याच्या निषेधार्थ आज, १२ जून रोजी सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्रातील सर्व जिल्हा केंद्रांवर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विहिंपचे सहमंत्री श्रीराज नायर आणि कोकण प्रांताचे प्रचार प्रमुख नरेंद्र मुजुमदार यांनी दिली.
हिंदू यात्रेकरूंवर जो हल्ला करण्यात आला आणि त्यात निष्पाप यात्रेकरूंचा मृत्यू झाला याबद्दल देशभरात संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मुंबईत अंधेरी पूर्व रेल्वे स्थानक, प्रसादम हॉटेल समोर हे आंदोलन होणार आहे.
जम्मू-काश्मीरमधील रियासीमध्ये यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी रविवार, ९ जून रोजी हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान बस दरीत कोसळली. या हल्ल्यात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी पहिले बसवर अंदाधुंद गोळीबार केला. यात बस चालकाला गोळी लागली त्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस बाजूच्या खड्ड्यात पडली. या हल्ल्यात ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. यात्रेकरूंनी भरलेली बस शिवखोडीहून कटरा येथे जात असताना बसवर दहशतवादी हल्ला झाला.
हे ही वाचा:
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वीकारला पदभार; जुलैमध्ये सातव्यांदा सादर करणार अर्थसंकल्प
अठराव्या लोकसभेचे विशेष अधिवेशन २४ जूनपासून
जम्मू-काश्मीर बस हल्ल्यामधील एका दहशतवाद्याचे रेखाचित्र पोलिसांनी केले प्रसिद्ध
जम्मू काश्मीरमधील डोडामध्ये लष्कराच्या तळावर गोळीबार, १ दहशतवादी ठार
बसवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ने स्वीकारली आहे. पोलिसांनी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एकाचे रेखाचित्र प्रसिद्ध केले आहे. तसेच त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्यास २० लाखांचे बक्षीसही पोलिसांनी जाहीर केले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या वर्णनाच्या आधारे पोलिसांनी एका दहशतवाद्याचे रेखाचित्र तयार केले आहे.