हिंदूंविरोधात वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींच्या विरोधात विहिंपकडून निदर्शने

राहुल गांधींचे वक्तव्य पूर्वनियोजित षडयंत्र असल्याची विहींपचे प्रदेश मंत्री मोहन सालेकर यांची टीका

हिंदूंविरोधात वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींच्या विरोधात विहिंपकडून निदर्शने

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण करताना हिंदुंबद्दल वक्तव्य केले होते. यावरून सभागृहात गदारोळ माजला होता. हिंदू हिंसा करतात, द्वेष पसरवतात आणि सतत खोटे बोलतात असे म्हटले होते. यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने याचा महाराष्ट्र आणि गोव्यात निषेध नोंदवला. राहुल गांधींविरोधात निदर्शने करण्यात आली.

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने संपूर्ण कोकण प्रांतातील (पालघर ते गोवा) ३३ जिल्ह्यांमध्ये जोरदार निदर्शने केली. पालघर, वसई, भाईंदर, बोरिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी सांताक्रुज, दादर, परेल, सायन, चेंबूर घाटकोपर,विक्रोळी,भांडुप, मुलुंड, ठाणे कळवा, भिवंडी, कुलाबा, पेण, पनवेल, रायगड, रत्नागिरी, गोवा आदी ठिकाणी आयोजित निदर्शने करण्यात आली असून मोठ्या संख्येने हिंदू समाज रस्त्यावर उतरला होता.

नवी मुंबईतील हिंदूंनी राहुल गांधी यांची बुद्धी ठिकाणावर येण्यासाठी स्थानिक ग्रामदेवतेला गाऱ्हाणे घातले. तर, धारावीत विभाग मंत्री राजीव चौबे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सर्व ठिकाणी हिंदू युवक मोठ्या संख्येने एकत्र आले आणि राहुल गांधींच्या नावाने निषेधाचा शिमगा केला. अनेक भागात राहुल गांधींच्या फोटोवर काळी शाई फेकण्यात आली, तर काही ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

सांताक्रुज स्थानकासमोर झालेल्या निषेध आंदोलनात विहींपचे प्रदेश मंत्री मोहन सालेकर यांनी राहुल गांधी यांचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी बोलताना मोहन सालेकर म्हणाले की, “राहुल गांधी संसदेत भगवान शंकरांचा फोटो दाखवून हिंदूंचा अपमान करतात, दुसरीकडे उत्तर प्रदेशात कैलास नावाची क्रिप्टो ख्रिश्चन व्यक्ती भोळ्या भाबड्या हिंदूंचे धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करते आणि तिसरीकडे हाथरसमध्ये भोले बाबा असे नाव घेणाऱ्या व्यक्तीच्या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत शंभरहून अधिक बळी जातात. याला काय म्हणावे? योगायोग की तुकडे तुकडे टोळीचे पूर्वनियोजित षडयंत्र,” अशी संतप्त प्रतिक्रिया मोहन सालेकर यांनी दिली आहे. “अलीकडच्या निवडणुकीच्या निकालानंतर देशातील तथाकथित सेक्युलर टोळी सक्रिय झाली आहे. दिल्लीत संसदेत हिंदूंना हिंसक म्हणणारे आणि हिंदूंच्या धार्मिक श्रद्धा कमजोर करून आपल्या संस्कृतीपासून दूर नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या भोले बाबाला संरक्षण देणारे हेच ते “यूपी के दो लडके ” आहेत. या तुकडे तुकडे टोळीचे प्रयत्न हा एक पूर्वनियोजित षडयंत्राचा भाग आहे,” अशी घणाघाती टीका मोहन सालेकर यांनी यावेळी बोलताना केली.

देशात भीतीचे आणि अस्थिरतेचे वातावरण तयार करून, हिंदू समाजात फूट पाडून आगामी विधानसभा अल्पसंख्यांकांच्या मतांची बेगमी करण्याचा डाव हिंदू समाजाने ओळखायला हवा. आपल्या अस्मितेच्या आणि अस्तित्वाच्या प्रश्नावर सकल हिंदू समाजाने संघटित विचार करावा असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

हे ही वाचा:

भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘कू’ बंद

वारकऱ्यांना महायुती सरकारकडून भेट; पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी

“संविधानाची प्रत घेऊन उड्या मारणाऱ्यांचा संविधान दिनाला होता विरोध”

भाजपाचा विरोध झुगारून नवाब मलिक अजित पवारांच्या बैठकीत

शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या निषेध सभांना बजरंग दलाचे संयोजक रणजीत जाधव, सहसंयोजक गौतम रावरीया, प्रांत सहमंत्री राजेंद्र पवार, मुंबई क्षेत्र मंत्री रामचंद्र रामुका आदी मान्यवरांनी संबोधित केले.

Exit mobile version