विनेश, बजरंगच्या निवडीविरोधात खेळाडू, पालकांचे आंदोलन

ऑलिम्पिक संघटनेच्या मुख्यालयाबाहेर लोक झाले जमा

विनेश, बजरंगच्या निवडीविरोधात खेळाडू, पालकांचे आंदोलन

विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांना थेट आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडण्यात आल्यानंतर अनेक खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती. त्याचे रूपांतर आता आंदोलनात झाले असून भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या मुख्यालयाबाहेर खेळाडू, त्यांचे पालक यांनी या निवडीविरोधात गोळा होत आंदोलन छेडले आहे.

 

 

विनेश आणि बजरंग यांची ऑलिम्पिक संघटनेच्या हंगामी समितीने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी थेट निवड केली. त्यांनी वर्षभर कोणतेही सामने खेळलेले नाहीत शिवाय, कोणत्याही स्पर्धेत त्यांनी दमदार कामगिरीही वर्षभरात केलेली नाही. तरीही त्यांची थेट निवड कशी काय केली, असा सवाल खेळाडू, पालक आणि कुस्तीगीरांच्या वर्तुळात विचारला जात आहे. हे दोन खेळाडू वगळता अन्य काही कुस्तीगीरांसाठी मात्र चाचणी होते आहे. त्यामुळे या दोन खेळाडूंना चाचणीतून का वगळण्यात आले, त्यामुळे ज्यांची आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याची इच्छा आहे, त्यांच्या संधीवर पाणी फेरले जात आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.

 

 

५३ किलो वजनी गटातील खेळाडू अंतिम पंघल तसेच ६५ किलोमधील सुजीत कलाकल या खेळाडूंनी याबाबत नाराजी व्यक्त करत न्यायालयात धाव घेतली आहे.आयओएच्या मुख्यालयाबाहेर १५० लोक जमले होते. त्यात चाचणीसाठी इच्छुक असलेले खेळाडू व त्यांच्या पालकांचा समावेश होता. आयओएच्या अध्यक्षा पीटी उषा व हंगामी समितीचे प्रमुख भूपिंदर सिंग बाजवा यांना भेटण्याची विनंती हे खेळाडू व त्यांचे पालक करत आहेत.

 

हे ही वाचा:

जैन साधूंच्या निघृण हत्याकांडा विरोधात विशाल मौन रॅलीचे आयोजन !

भारत वेस्ट इंडिज शतकी कसोटी, कोहली ५००

मणिपूर: महिलांची नग्न धिंड प्रकरणातील पहिल्या आरोपीला अटक !

मनुष्य- बिबट्या संघर्ष टाळण्यासाठी वापरणार अत्याधुनिक तंत्रज्ञान

अंतिम पंघलचे प्रशिक्षक विकास भारद्वाज यांनी सांगितले की, आम्हाला आयओएच्या समिती सदस्यांची भेट घ्यायची आहे. कोणताही पक्षपाती निर्णय आम्हाला मान्य नाही. हे चूक आहे. बजरंग आणि विनेश यांना चाचणीतून देण्यात आलेली सूट रद्द करावी अशी आमची मागणी आहे. मंगळवारी बाजवा यांच्या नेतृत्वाखालील हंगामी समितीने जाहीर केले की, सर्व गटांसाठी चाचणी घेतली जाईल पण ५३ किलो आणि ६५ किलो वजनी गटासाठी आधीच निवड झालेली आहे.

 

 

यानंतर ही नाराजी पसरू लागली. चाचणी न घेताच विनेश आणि बजरंगची निवड केल्यामुळे पंघल आणि सुजीत यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांनी या याचिकेत या दोन खेळाडूंची निवड रद्द करावी आणि चाचणी घ्यावी अशी मागणी केली आहे.

Exit mobile version