वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. भारत सरकारच्या आकडेवारीनुसार, भारतात सध्या ३०,००० वाघ आहेत. जगातील वाघांच्या संख्येच्या तुलनेत हे प्रमाण ७० टक्के आहे. वाघांची संख्या दरवर्षी६ टक्क्यांनी वाढत आहे. स्वातंत्र्यानंतर एक काळ असा होता जेव्हा भारताला वाघ वाचवण्यासाठी मोहीम राबवावी लागली. त्याला प्रोजेक्ट टायगर असे नाव देण्यात आले. भारत यावर्षी प्रोजेक्ट टायगरची ५० वर्षे आणि प्रोजेक्ट एलिफंटची ३० वर्षे साजरी करत आहे. भारत पाच दशकांपासून ही मोहीम राबवत आहे.
भारताने १ एप्रिल १९७३ रोजी प्रथम प्रकल्प टायगर सुरू केला. प्रोजेक्ट टायगर सुरू झाला तेव्हा १८,२७८ चौरस किमीमध्ये पसरलेल्या ९ व्याघ्र प्रकल्पांचा त्यात समावेश करण्यात आला. आज ५० वर्षांनंतर ७५,००० चौरस किमी क्षेत्र व्याघ्र प्रकल्पाने व्यापले आहे. व्याघ्र प्रकल्प हे वाघ नामशेष होण्याच्या उंबरठ्यावरून त्यांना परत आणण्यात यशस्वी ठरला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकारणांतर्गत सर्व संभाव्य वाघांचे अधिवास आणत आहे जेणेकरून ‘वाघांच्या लोकसंख्येचे शाश्वत आधारावर संरक्षण केले जाऊ शकेलं असे पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटले आहे.
भारत हा जगातील प्रमुख जैवविविधता असलेल्या देशांपैकी एक आहे, जिथे जगभरात आढळणाऱ्या वन्यजीवांच्या अनेक प्रजाती राहतात. या प्राण्यांच्या संरक्षणासाठी भारतात अनेक बायोस्फियर रिझर्व्ह तयार करण्यात आले आहेत. याशिवाय वन्यजीवांच्या संवर्धनासाठी भारत सरकारकडून अनेक प्रकल्प राबविण्यात येत आहेत.
पंतप्रधान मोदी करणार विशेष नाण्याचे अनावरण
प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ, भारत सरकार ९ एप्रिलपासून म्हैसूर, कर्नाटक येथे तीन दिवसीय कार्यक्रम सुरू करणार आहे. पंत्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी पंतप्रधान देशातील वाघांच्या संख्येची नवीनआकडेवारी जाहीर करतील. यासोबतच एका प्रकल्पाच्या स्मरणार्थ एक नाण्याचे अनावरण करण्यात येणार आहे.
प्रोजेक्ट एलिफंटची ३० वर्ष पूर्ण
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ७ एप्रिल रोजी आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात हत्ती प्रकल्पाच्या ३० वर्षांच्या निमित्ताने दोन दिवसीय ‘गज उत्सव’ चे उद्घाटन करतील. भारताने १९९१-९२ मध्ये हत्तींच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी, मानव-हत्ती संघर्ष रोखण्यासाठी आणि बंदिवान हत्तींसाठी केंद्र प्रायोजित योजना म्हणून हत्ती प्रकल्प सुरू केला. भारतात जवळजवळ २७,०० आशियाई हत्ती आहेत. २०१७ च्या हत्ती जनगणने नुसार, कर्नाटकात ६,०४९, आसाम ५,७१९ आणि केरळमध्ये ३,०५४ हत्ती असल्याचे आढळून आले. सरकारने भारतातील “प्रोजेक्ट टायगर आणि प्रोजेक्ट एलिफंट” या दोन प्रमुख प्राणी संरक्षण योजनांसाठी निधी एकत्र केला आहे.