देशात आणि राज्यात कोविडने थैमान घातले आहे. अनेक अत्यवस्थ रुग्णांना रेमडेसिवीर या औषधाची गरज पडत असताना राज्यात त्याचा भयंकर तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र आता थेट वर्ध्यातच रेमडेसिवीरचे उत्पादन होणार आहे. या औषधाच्या निर्मितीची परवानगी वर्धा येथील जेनेटिक लाईफ सायन्स या कंपनीला देण्यात आली आहे.
वर्ध्याच्या सेवाग्राम एमआयडीसी येथील जेनेटिक लाइफ सायन्स कंपनीमध्ये आजपासून रेमडिसिव्हीर इंजेक्शन निर्मितीला सुरुवात झाली आहे. सेवाग्राम येथील जेनेटिक कंपनीला त्याचा परवाना देखील मिळाला, आता प्रत्यक्ष त्याच्या उत्पादनाला सुरवात होत आहे.
हे ही वाचा:
मराठा आरक्षणाच्या नावावर सरकार एप्रिल फुल बनवत आहे- आशिष शेलार
उद्धव ठाकरे तोंडावर गोड, आतून महाकपटी
कॅमेरामन, पत्रकारांना तत्काळ ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ घोषित करा
बार मालकांप्रमाणे शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दलही पत्र लिहा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष प्रयत्नांतून विदर्भात कोविड रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या या इंजेक्शनचे उत्पादन होत आहे. त्यांनी कंपनीत होणाऱ्या उत्पादनाची पाहणी केली. येथे दिवसाला सुमारे ३० हजार व्हायल इतके उत्पादन होणार असल्याची माहिती कंपनी प्रशासनाने दिली आहे. गरज ओळखून हे उत्पादन ५० हजार व्हायल पर्यंत वाढविण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली पाहणी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कंपनीचे उत्पादन पाहून समाधान व्यक्त केले आहे. येथे रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन सुरू झाले हा समाधानाचा आणि आनंदाचा क्षण आहे, असे गडकरी म्हणाले. काही दिवसांपासून अनेक रुग्ण या औषधासाठी तडफड करत आहेत. या औषधाबाबत लोकांमध्ये अस्वस्थता देखील आहे. आज या औषधाचे उत्पादन सुरू झाले. याचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत वर्धा जिल्ह्यात आणि विदर्भात केले जाईल. त्यानंतर मग महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न राहील. त्यानंतर देशभरातही जाईल. मात्र वर्धा जिल्ह्याला प्राधान्य देण्यात येईल असे गडकरी यांनी सांगितले.
संपूर्ण राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरू आहे. विदर्भात देखील रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असून येथेही इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचे समोर आले आहे. आता वर्ध्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यास अनेकांचे जीव वाचणार आहेत, शिवाय सुरू असलेल्या काळ्याबाजाराला देखील आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.