देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवलेला आहे. त्याविरोधात भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम देखील राबवली जात आहे. या लसीकरण मोहिमेची मदार कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींवर राहिली आहे. त्यापैकी कोवॅक्सिनचे उत्पादन १० कोटी डोस प्रतिमहिना वाढवण्याचा इरादा असल्याचे निती आयोगातील आरोग्य विभागाचे सदस्य डॉ. व्हि. के पॉल यांनी सांगितले.
देशातील लसीकरण मोहिमेला १६ जानेवारीपासून सुरूवात झाली. भारत जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम राबवत आहे. या लसीकरण मोहिमेत कोवॅक्सिन ही एक लस आहे. सध्या या लसीचे उत्पादन महिन्याला केवळ १.५ कोटी डोस इतकेच होत आहे. ते वाढवून १० कोटी डोसपर्यंत नेण्याचा सरकारचा इरादा आहे.
हे ही वाचा:
रवी पुजारीच्या अटकेनंतर सुरेश पुजारीच्या कारवाया सुरू?
रा.स्व.संघाच्या गणवेशाने माविआ मंत्र्यांना कळा
पब्लिक सब जानती है…देवेंद्र फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र
कोवॅक्सिन ही भारतीय बनावटीची लस आहे. हैदराबाद येथील भारत बायोटेक या कंपनीने आयसीएमआरच्या सहाय्याने या लसीची निर्मिती केली. या लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी, पुण्याच्या नजीक मांजरी येथील एका लस उत्पादन कारखान्यात कोवॅक्सिनचे उत्पादन करण्याची परवानगी बायोव्हेट या भारत बायोटेकच्या सहयोगी संस्थेला देण्यात आली आहे. लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित होऊन, ऑगस्ट अखेरपर्यंत या कारखान्यातून उत्पादन होऊ शकणार आहे.
भारतीय लसीकरणाला आणखी बळकटी येण्यासाठी पुढच्या आठवड्यापासून स्पुतनिक या रशियन लसीचा वापर देखील केला जाणार आहे. ही लस देखील लवकरच भारतात तयार व्हायला सुरूवात होणार आहे. सध्या या लसीच्या एका मात्रेची किंमत सुमारे ९९५ रुपये सांगण्यात आली आहे. ही लस भारतात डॉ. रेड्डीज लॅबॉरेटोरिज मार्फत आणली जाणार आहे. या लसीचे उत्पादन भारतात सुरू झाले की मग या लसीची किंमत कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतातील लसीकरण मोहिम १६ जानेवारीपासून सुरू झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने एकेका वयोगटासाठी लस खुली करण्यात आली. सध्या १८ ते ४४ वर्षे वयोगटापर्यंत लसीची प्राप्ती वाढवण्यात आली आहे.