‘हेअरकट’मुळे वाढली डोकेदुखी

मुख्याध्यापकांनी सलून चालकाला जोडले हात

‘हेअरकट’मुळे वाढली डोकेदुखी

अनेक जण आपल्या आवडता क्रिकेटपटू, अभिनेता किंवा अभिनेत्रीसारखे दिसण्याचा, ते जे कपडे घालतात, तसे घालण्याचा किंवा त्यांच्यासारखे वागण्याचा प्रयत्न करत असतात. यात काही नवीन नाही. आता तर अनेक जण त्यांच्या आवडत्या कलाकारांनी गोंदवलेले टॅटू आपल्या शरीरावर गोंदवू लागले आहेत. आपल्या आवडत्या अभिनेत्याचा एखाद्या चित्रपटातला हेअरकट करून घेणे, हे त्यातल्या त्यास सोपी आणि कमी खर्चिक बाब! त्यामुळे अनेकांचा असा हेअरकट करण्याकडे कल असतो. मात्र, या हेअरकटच्या फॅडमुळे कर्नाटकातील कुलहल्ली गावातील शाळेच्या मुख्याध्यापकांची डोकेदुखी वाढली आहे.

या गावातील अनेक शाळकरी मुलांनी ब्लॉकबस्टर चित्रपट ‘हेब्बुली’ या चित्रपटातील अभिनेता सुदीपसारखे केस कापले आहेत. त्यामुळे या सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने थेट स्थानिक सलून मालकाला पत्र लिहून ‘मुलांच्या या हेअरकटची मागणी पूर्ण करू नका,’ अशी कळकळीची विनंती केली आहे.

मुख्याध्यापकांनी लिहिलेले हे पत्र व्हायरल झाले असून पालक तसेच शिक्षणतज्ज्ञांनी या पत्राबाबत त्यांचे कौतुक केले आहे.
मुख्याध्यापक शिवाजी नाईक लिहितात, “आमच्या शाळेतील अनेक विद्यार्थी ‘हेब्बुली’ शैलीतील केस कापत आहेत. त्यांच्या या फॅशन करण्याच्या आवडीमुळे त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही आणि त्याचा परिणाम त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर होऊ लागला आहे. मी तुम्हाला विनंती करतो की, आमच्या विद्यार्थ्यांना नीटनेटका हेअरकट द्या. एखाद्या विद्यार्थ्याने फिल्मी शैलीतील केस कापण्याची मागणी केल्यास, कृपया पालकांना किंवा शाळेला कळवा.”

हे ही वाचा:

मणिपूरमधील हिंसाचार चिघळला; दंगलखोरांनी शाळा पेटवली

सात्विक-चिरागला वर्षातील तिसरे विजेतेपद !

न्यायाधीशांचा कुत्रा हरवला; सुरक्षा कर्मचाऱ्याला निलंबित करा!

मुंबईत तस्करी करून आणलेली ३० कोटींची घड्याळे जप्त

हे पत्र इंटरनेटवर खूप व्हायरल झाले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सलूनचे मालक चन्नाप्पा सिद्धरामप्पा यांनी मुख्याध्यापकांची ही विनंती मान्य करून मुलांचे ‘फिल्मीस्टाइल’ केस कापणे बंद केले आहे.

Exit mobile version