यंदा कबड्डी.. कबड्डी.. चा आवाज घुमणार बंगळुरूमध्ये!

यंदा कबड्डी.. कबड्डी.. चा आवाज घुमणार बंगळुरूमध्ये!

कोरोनाच्या संकटाचा विपरीत परिणाम क्रीडा क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात झाला होता. मात्र, सर्व पूर्वपदावर येत असतानाच क्रीडा रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रो कबड्डी लीगचा आठवा सिझन डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. संपूर्ण स्पर्धा ही जैव सुरक्षित (बायो बबल) वातावरणात पार पडणार आहे. यंदा ही स्पर्धा बंगळुरूमध्ये पार पडणार आहे.

प्रो कबड्डी लीगचा सातवा सिझन २०१९ मध्ये पार पडला होता. मधल्या लॉकडाऊन आणि निर्बंधांच्या काळात सर्वच क्रीडा प्रकारांनी विश्रांती घेतली होती. कोरोनाच्या संकटानंतर भारतात होणारी ही पहिली इनडोअर स्पर्धा असेल. स्पर्धेच्या आयोजनासाठी बंगळुरू सोबतच अहमदाबाद आणि जयपूर या शहरांचा देखील विचार केला जात होता. मात्र, अखेर बंगळूरू शहराची निवड करण्यात आली.

हे ही वाचा:

अलिबागच्या कांद्याचा का झाला गौरव?

ठाण्यात पालिकेच्या कारभारालाच पडले मोठे भगदाड!

हमी कालावधीतच खड्डे पडण्याची हमी!

लखीमपूर खिरीमधील मृतांना सरकारकडून ४५ लाखांची मदत

कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी या सिझनमधील स्पर्धा दरवर्षीप्रमाणे तीन महिने १२ शहरात होणार नसून केवळ एकाच केंद्रावर पार पडणार आहे. ही स्पर्धा कांतीरवा इनडोअर मैदानावर पार पडेल. लीगसाठी सर्व खेळाडूंचे पूर्ण लसीकरण होणे बंधनकारक असून स्पर्धेपूर्वी १४ दिवस खेळाडूंनी एकत्र येणे आवश्यक आहे.

जयपूर पिंक पँथर्सने १६ ऑक्टोबरपासून त्यांच्या संघाच्या सरावाची सुरुवात होईल, अशी घोषणा केली आहे. तेलगू टायटन्स संघ ७ ऑक्टोबरपासून हैदराबाद येथे एकत्र येणार आहे. लीगचा आठवा सिझन जुलैमध्ये अपेक्षित होता. मात्र कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता ही लीग आता वर्षा अखेरीस सुरू होणार आहे. या लीगसाठी खेळाडूंचा लिलाव २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान पार पडला.

Exit mobile version