पृथ्वीराजच्या रूपात कोल्हापूरला मिळाली २१ वर्षांनी महाराष्ट्र केसरीची गदा

पृथ्वीराजच्या रूपात कोल्हापूरला मिळाली २१ वर्षांनी महाराष्ट्र केसरीची गदा

महाराष्ट्र केसरी या महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या कुस्ती स्पर्धेची चांदीची गदा पटकाविली ती कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने. कोल्हापूरला २१ वर्षानंतर प्रथमच महाराष्ट्र केसरी हा मानाचा किताब जिंकता आला.

कोल्हापूरला कुस्तीचे माहेरघर मानले जात असले तरी या जिल्ह्याला २१ वर्षांपासून ही गदा जिंकता आलेली नाही. पृथ्वीराजने विशाल बनकरला चितपट करत हा मान मिळविला. सोलापूरच्या विशाल बनकर आणि पृथ्वीराज यांच्यातील ही महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत चर्चेता विषय बनली. बनकरने सुरुवातीला आघाडी घेतली खरी पण पृथ्वीराजने लढतीचे चित्र बदलत महाराष्ट्र केसरी किताब जिंकला.

पृथ्वीराजने चार गुणांची पिछाडी भरून काढत ५ विरुद्ध ४ असा विजय मिळवला. पृथ्वीराज ४५ वा महाराष्ट्र केसरी ठरला. या अगोदर पृथ्वीराजने पुणे शहरच्या हर्षद कोकाटेवर एकतर्फी विजयाची नोंद केली होती, तर विशालने वाशिमच्या सिकंदर शेखचा तेरा विरुद्ध दहा गुण फरकाने मात करत अंतिम लढतीत प्रवेश केला होता. राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने आणि सातारा जिल्हा तालीम संघ आयोजित ही ६४ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताबाची स्पर्धा होती.

साताऱ्यात झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम लढतीकडे महाराष्ट्राचे डोळे लागून राहिले होते. ही लढत पाहण्यासाठी मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमींची गर्दी झाली होती.

हे ही वाचा:

ठाण्यात रामनवमी निमित्त भव्य मिरवणूक

नितीन गडकरी यांच्यानंतर, रावसाहेब दानवे गेले राज ठाकरेंच्या भेटीला

सपा कार्यकर्त्याने केला भररस्त्यात गोळीबार; दोघांना घेतले ताब्यात

आता यूपीतील जनतेला मिळणार देशात कुठेही रेशन

 

महाराष्ट्र केसरी किताबवीर पृथ्वीराज हा कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील देवठाणे गावचा. मोतीबाग तालीमतून त्याने कुस्तीचे प्रशिक्षण घेतले. भारत केसरी दादू चौगुले, धनाजी पाटील, संग्राम पाटील यांच्याकडून त्याने कुस्तीचे धडे गिरविले. सेनादलात तो हवालदार पदावर कार्यरत आहे. ज्युनियर वर्ल्डकप कुस्ती स्पर्धेत त्याने ब्राँझपदकाची कमाई केलेली आहे. महाराष्ट्र केसरी किताब जिंकल्यानंतर आता त्याची चर्चा सुरू झाली आहे.

 

Exit mobile version