वीर बाल दिनी १७ शूर मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार

राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात पार पडला कार्यक्रम

वीर बाल दिनी १७ शूर मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरूवारी १७ मुलांना सात श्रेणींमध्ये विविध क्षेत्रात त्यांच्या असामान्य कामगिरीबद्दल प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केला. राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात हा कार्यक्रम पार पडला. कला आणि संस्कृती, शौर्य, नवोपक्रम, विज्ञान आणि तंत्रज्ञान, समाजसेवा आणि पर्यावरण या सात श्रेणींमध्ये असाधारण आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.

या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपतींनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच या मुलांच्या कार्याचा संपूर्ण देशाला आणि समाजाला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पुरस्कार प्राप्त मुलांना सांगितले की, त्यांनी असामान्य कार्य केले आहे, आश्चर्यकारक कामगिरी केली आहे, त्यांच्यात अमर्याद क्षमता आणि अतुलनीय गुण आहेत. तसेच त्यांच्या कार्यातून त्यांनी देशातील मुलांसमोर आदर्श ठेवला आहे.

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, मुलांच्या कलागुणांना संधी देणे आणि ओळखणे हा आपल्या परंपरेचा एक भाग आहे. ही परंपरा आणखी दृढ व्हायला हवी यावर त्यांनी भर दिला. त्या म्हणाल्या की २०४७ मध्ये जेव्हा आपण भारताच्या स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करणार आहोत, तेव्हा हे पुरस्कार विजेते देशाचे सुबुद्ध नागरिक असतील. अशी हुशार मुले- मुली विकसित भारताचे निर्माते होतील. राष्ट्रपती म्हणाल्या की, पुरस्कार विजेत्या मुलांमधील देशभक्तीची उदाहरणे आपल्या देशाच्या आशादायक भविष्यावर आपला विश्वास दृढ करतात. देशभक्ती तरुण आणि वृद्धांना राष्ट्राच्या कल्याणासाठी संपूर्ण समर्पणाच्या मार्गावर घेऊन जाते. मला विश्वास आहे की, आताच्या मुलांचे कर्तृत्व भारताला प्रगतीच्या शिखरावर नेईल.”

हे ही वाचा : 

काँग्रेसच्या कार्यक्रमात भारताच्या नकाशातून पीओके, अक्साई चीन गायब

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची गाडी उलटून झालेल्या अपघातात महाराष्ट्रातील दोन जवान!

कल्याण:अल्पवयीन मुलीवर अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी!

हरियाणात ख्रिसमसचा कार्यक्रम विहिंप, बजरंग दलाने उधळवला, हनुमान चालीसाचे पठण

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वीर बाल दिवसा’च्या वेळी साहिबजादांच्या धैर्यावर प्रकाश टाकला आणि म्हटले की, त्यांचे धैर्य आणि बलिदान हे भारताच्या मजबूत लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. ते म्हणाले, “साहिबजादांचे धैर्य आणि बलिदान हे भारताच्या मजबूत लोकशाहीमागील आधारस्तंभ आहेत ज्याचा भारताला आज अभिमान आहे. साहिबजादांच्या शौर्याचे आणि बलिदानाचे स्मरण करण्यासाठी आमच्या सरकारने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Exit mobile version