पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने अनेक महत्त्वाची आर्थिक धोरणे आखली. ज्यामुळे करोडो लोकांचे जीवन बदलले. आता वंचित घटकांना सामावून घेतले जात आहे. मोदी सरकारच्या काळात विकासाचे नवे आयाम प्रस्थापित झाले. खऱ्या अर्थाने लोककल्याणाचे काम मोदी सरकारने केले असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज येथे काढले. मिशन महाविजय २०२४ अंतर्गत मुंबई भाजपा लोकसभा निवडणूक संचालन समितीची पहिली बैठक दादर येथील भाजपा कार्यालयात पार पडली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रा देशातील २ लाख ६९ हजार पंचायतींमध्ये जाणार आहे. त्याचबरोबर ४ हजाराहून अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विकसित भारताची माहिती संकल्प यात्रेच्या माध्यमातून लोकांना दिली जात असून केंद्र सरकारच्या योजनांचा लाभही दिला जात आहे. त्यातून वंचित गरजूंना जोडले जात आहे. या यात्रेशी १०.५ कोटीहून अधिक लोक जोडले गेले आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. भविष्यातही ८० करोड लोकांना मोफत धान्य आणि ६० करोड लोकांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंत मोफत उपचार दिले जातील. पक्क्या घरांपासून ते शौचालयापर्यंत तसेच प्रत्येक घरात नळाचे पाणी, बँकिंग सुविधा, स्वस्त गॅस, उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलिंडर देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे.
हेही वाचा..
कॉंग्रेस नेते राम मंदिर उद्घाटनाला जाणार नाहीत
अयोध्या, काशी,मथुरा नंतर आता राजस्थानच्या ८०० वर्ष जुन्या मशिदीवर प्रश्न!
निवडणूक संचालन समितीच्या समन्वयकपदी आ. अतुल भातखळकर
भारतातील सर्वात वयोवृद्ध सरिस्काची वाघीण ‘राजमाताचा’ मृत्यू!
नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या हमीबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, सबका साथ, सबका विकास आणि सबका कल्याण यासाठी म्हणत आहे की, या कल्याणकारी योजनांवर सर्वांचे लक्ष आहे. ४ कोटी पक्की घरे, १२ कोटी शौचालये, १३ कोटी घरांना नळाच्या पाण्याची सुविधा, ६० कोटी लोकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्याचे, खेड्यापाड्यात वीज पोहोचवण्याचे काम केले गेले आहे. दुसरीकडे एम्ससारख्या संस्था ७ वरून २३ पर्यंत नेल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय बनवले जात आहे. ११०० नवीन विद्यापीठ तसेच सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क उभारण्याच्या दिशेने पावले टाकली जात आहेत. दीड लाख किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग बनवला गेला. ३ लाख २० हजार ग्रामीण रस्त्यांमध्ये वाढ करून चार लाख किलोमीटरची जोडणी पूर्ण झाली आहे. मला हे सांगायचे आहे की, मोदींनी पुढील ५ वर्षांची हमी दिली आहे त्यानुसार देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, भारतीय जनता पक्ष आणि मोदी सरकार विजयाची हॅट्ट्रिक साधणार तसेच मुंबईत सहापैकी सहा लोकसभेच्या जागा जिंकून षटकार मारणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. लोकशाही चॅनेलवरील बंदी बाबत बोलताना ते म्हणाले, चॅनलला पाठवलेल्या नोटीसला प्रतिसाद देऊन नियमानुसार कार्यवाही केली तर सकारात्मक होईल. ममता बॅनर्जी यांनी राम मंदिराविषयी केलेल्या टिप्पणीवर बोलताना ते म्हणाले, राम सर्वांचा आहे. सर्वजण रामाचे आहेत. भारतभर राममय वातावरण आहे. भारतातील लोकांची ५०० वर्षांची प्रतिज्ञा, संकल्प, त्याग याची पूर्ती होण्याची वेळ आली आहे. यावर्षी तीनवेळा दिवाळी साजरी होईल. एकदा २२ जानेवारीला भव्य रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्यादिवशी, दुसरी मंदिर पूर्ण झाल्यावर आणि तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन होईल त्यावेळी तिसरी दिवाळी साजरी होईल.
पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दौऱ्याबद्दल बोलताना ते म्हणाले, राष्ट्रीय युवा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये देशभरातील तरुणांना संबोधित करणार आहेत. यंदाचा राष्ट्रीय युवा दिन १२ ते १६ जानेवारी या कालावधीत नाशिक येथे साजरा केला जाणार आहे. पहिल्याच दिवशी १ लाख तरुणांना पंतप्रधान थेट संबोधित करतील. देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. आणि माय भारत, माय युवा भारत अंतर्गत किंवा एनएसएससारख्या संस्थांच्या माध्यमातून देशातील महाविद्यालये आणि शाळांमध्ये हजारो कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. पंतप्रधान मोदी यांचे भाषण ऐकण्याची संधी करोडो तरुणांना मिळणार आहे. आम्हाला त्यांच्याकडून प्रेरणा मिळेल, कारण केवळ मोदीजींच्या नेतृत्वाखालीच आम्ही स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून देश मजबूत करू शकलो. आज भारत जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इको सिस्टम बनला आहे. डिजिटल पेमेंटमध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. चांद्रयान मोहिमेचे यश असो किंवा कोविड व्यवस्थापनात नंबर एक बनणे असो या सगळ्यात सर्वात मोठा वाटा तरुणाईचा आहे. खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात विक्रमी पदके मिळवली आहेत. नवीन शैक्षणिक धोरणातून स्थानिक भाषांना भर दिला जात आहे. हे सर्व मोदी सरकारमुळे घडले. २०४७ पर्यंत विकसित भारत बनवण्याचा संकल्प घेऊन वाटचाल करा असेही ते म्हणाले.