पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक वन्यजीव दिनानिमित्त ट्वीट करताना वन्यजीवांच्या सुरक्षित अधिवासासाठी प्रयत्न करण्यावर भर दिला आहे. त्याबरोबरच वन्यजीवांसाठी काम करणाऱ्यांना मोदींनी अभिवादन देखील केले आहे.
मोदी यांनी ट्वीट मध्ये, “जागतिन वन्यजीव दिनानिमित्त मी वन्यजीवांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाला सलाम करतो. वाघ असो, सिंह असो अथवा बिबटे असोत भारतात यांची संख्या सातत्याने वाढत आहे. आपण आपल्या जंगलांच्या संरक्षणासाठी आणि वन्यजीवांच्या सुरक्षित अधिवासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत.” असे म्हटले आहे.
याबद्दल केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील याबाबत ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी भारतातील काही ठळक वन्यजीवांच्या वाढत्या संख्येबद्दल सांगितले आहे. त्याबरोबरच या ट्वीटमध्ये त्यांनी नष्ट झालेल्या चित्ता या प्रजातीच्या पुनरुज्जीवनाबाबत देखील सांगितले आहे. ते म्हणतात की, “भारतात वन्यजीव आणि जैवविविधता हळूहळू बहरत आहे. जगातील एकूण वाघांपैकी ७० टक्के वाघ, ७० टक्के आशियाई सिंह आणि ६० टक्के बिबटे भारतात आहेत. मोदी सरकार १९५२ सालीच नष्ट झालेल्या चित्त्याला पुनरुज्जीवीत करण्याच्या प्रयत्नात आहेत.”