‘मन की बात’ मधून पंतप्रधान मोदींनी केले आवाहन
आज, ३१ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ मधून देशाला संबोधित केलं आहे. ‘मन की बात’ मधून पंतप्रधान मोदींनी विविध विषयांवर भाष्य केलं. पण मुख्य विषय ठरला तो वर्धापन दिनाचा आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा. देशातील महान क्रांतिकारकांचे स्मरण करून त्यांनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन जनतेला केले आहे.
आज ‘मन की बात’ चा ९१ वा भाग होता. यावेळी पंतप्रधान मोदींनी भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होणार या पार्श्वभूमीवर संवाद साधला. ते म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबविण्यात येत आहे. लोकांनी या मोहिमेचा भाग बनून १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकावा. तिरंगा आपल्याला एकत्र करतो आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. २ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत आपण सर्वजण आपल्या सोशल मीडिया प्रोफाइल पिक्चरमध्येही तिरंगा ठेऊ शकतो, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, आपण सर्व देशवासियांनी आपले कर्तव्य पाळले पाहिजे. तरच आपण त्या अगणित स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न पूर्ण करू शकू, स्वातंत्र्यसैनिकांच्या स्वप्नातील भारत घडवता येईल. म्हणूनच आपला पुढील २५ वर्षांचा हा अमृतकाळ प्रत्येक देशवासियांसाठी कर्तव्यकाळ आहे. आपल्या शूर सैनिकांनी ही जबाबदारी आपल्याला दिली आहे आणि ती पूर्ण करण्याचा निश्चय करायचा आहे.
तिरंग्याच्या इतिहासाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, २ ऑगस्टचा तिरंग्याशी विशेष संबंध आहे. कारण या दिवशी पिंगली व्यंकय्या जी यांची जयंती आहे. पिंगली व्यंकय्या यांनी राष्ट्रध्वजाची रचना केली होती. तिरंग्याला आकार देण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महान क्रांतिकारक मादाम कामा यांचेही यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांचे स्मरण केले आहे.
हे ही वाचा:
“संजय राऊत यांच्यावर होत असलेल्या कारवाईने आनंद”
“आमची सकाळ खराब करणाऱ्यांची सकाळ खराब होत असताना पाहून समाधान वाटतंय”
तिस्ता सेटलवाड आणि श्रीकुमार यांना दिलासा नाहीच
राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना हा कालावधी कर्तृत्व गाजवणारा ठरला आहे. त्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय खेळाडूंचे कौतुक केले आहे. यात पीव्ही सिंधू, नीरज चोप्रा यांसह अन्य भारतीय खेळाडूंचे त्यांनी अभिनंदन केले आहे. यासोबतच देशभरात नुकतेच दहावी, बारावीचे निकालही जाहीर झाले आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे. ज्यांनी आपल्या परिश्रम आणि समर्पणाने यश संपादन केले आहे. महामारीमुळे गेली दोन वर्षे अत्यंत आव्हानात्मक होती. या परिस्थितीत तरुणांनी दाखवलेले धैर्य आणि संयम अत्यंत कौतुकास्पद आहे. या सर्वांना उज्ज्वल भविष्यासाठी पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.