पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाहांनी बजावला मतदानाचा हक्क!

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात अहमदाबाद येथून केलं मतदान

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाहांनी बजावला मतदानाचा हक्क!

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवार, ७ मे रोजी मतदान पार पडत आहे. या तिसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर मतदान होणार आहे. एकूण १२ राज्यात मतदान होत असून त्यात महाराष्ट्रातील ११ जागा आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावा यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला आहे. अहमदाबादमध्ये जाऊन त्यांनी मतदानाचं कर्तव्य पार पाडलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः वाराणसी येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून शेवटच्या टप्प्यात तिकडे मतदान होणार आहे. अशातच अहमदाबादमध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदान होत असून त्यांनी सकाळीच जाऊन त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे. निशान पब्लिक स्कूलमध्ये जाऊन नरेंद्र मोदींनी मतदान केलं. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सहकुटुंब मतदानाचं कर्तव्य पार पाडलं.

मतदानानंतर नरेंद्र मोदींनी माध्यमांशी संवादही साधला. जास्तीत जास्त लोकांनी घराबाहेर पडून आपलं मतदानाचं कर्तव्य पार पाडा, असं आवाहन नरेंद्र मोदींनी यावेळी जनतेला केलं. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत त्यांनाही प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला. “या उन्हात रात्रंदिवस फेऱ्या मारत आहात. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी करावी. माध्यमांमध्ये सध्या बरीच स्पर्धा आहे. इकडे-तिकडे आधी धावावे लागते,” असे सांगत त्यांनी माध्यमकर्मींना उन्हात सांभाळून राहण्याचा आणि जास्तीत पाणी पिण्याचा काळजीयुक्त सल्ला दिला.

हे ही वाचा:

पूंछ हल्ल्याप्रकरणी दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी, २० लाखांचे बक्षीस जाहीर!

दिल्लीनंतर आता अहमदाबादच्या शाळांना बॉम्बची धमकी!

‘४ जून ही बीजेडी पक्षाची एक्स्पायरी डेट’

क्रिकेटचा चेंडू प्रायव्हेट पार्टला लागल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू!

पुढे नरेंद्र मोदी असेही म्हणाले की, “आज मतदानाचा तिसरा टप्पा आहे, देशवासियांना आवाहन करेन की लोकशाहीत मतदान हे साधे दान नाही, आपल्या देशात दानाला महत्त्व आहे. देशवासीयांनी जास्तीत जास्त मतदान करावे. इथेच मी नियमितपणे मतदान करतो. काल रात्री आंध्रहून आलो. आत्ता सध्या गुजरातमध्ये आहे. अजून मध्य प्रदेशात जायचे आहे. तेलंगणमध्येही जायचे आहे,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.

Exit mobile version