भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्राला उद्देशून संबोधन केले आहे. त्यांनी देशात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर यावेळी त्यांनी सर्व स्वातंत्र्यसैनिकांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले आहे.
‘स्वातंत्र्यदिन आपल्यासाठी पारतंत्र्यातून मुक्ततेचा सण आहे. पिढ्यानुपिढ्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या संघर्षामुळे आपलं स्वातंत्र्याचं स्वप्न साकार झालं होतं. त्या सर्वांनी, त्याग आणि बलिदान यांची अनोखी उदाहरणं सर्वांसमोर ठेवली. त्यांच्या शौर्य आणि पराक्रमाच्या जोरावरच आज आपण सर्वजण स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेत आहोत. मी त्या सर्व अमर स्वातंत्र्यसैनिकांच्या पवित्र स्मृतींना श्रद्धेनं वंदन करतो.’ असे राष्ट्रपती म्हणाले.
यावेळी बोलताना त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या शानदार कामगिरीचेही कौतुक केले. १२१ वर्षांच्या ऑलिम्पिक इतिहासात भारताने सर्वाधिक पदके पटकावण्याचा इतिहास या वर्षी रचला असे राष्ट्रपती म्हणाले. तर यावेळी ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
हे ही वाचा:
बडोद्यातील मंदिरांना लाऊड स्पीकर वाटप
कोकणातील महापुरात उद्योग गेला वाहून
भारतातील चार पाणथळ ठिकाणांचा रामसर यादीत समावेश
फेलिक्सने दाखवून दिली प्रायोजकांना त्यांची ‘जागा’
या वर्षी देखील कोविड महामारीमुळे स्वातंत्र्य दिन समारंभ मोठ्या प्रमाणात साजरा करणे शक्य होणार नाहीये असे सांगताना कोरोनाची तीव्रता कमी झाली असली तरीही त्याचा प्रभाव अजून संपलेला नाही असे राष्ट्रपतींनी आवर्जून सांगितले. तर या महामारीत केंद्र सरकारने केलेल्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले आहे. तर त्या जोडीलाच राज्य सरकारे, खासगी क्षेत्रातल्या आरोग्य सुविधा, स्वयंसेवी संस्था यांचेदेखील राष्ट्रपतींनी कौतुक केले.
महामारीच्या कालखंडात सर्व प्रकारच्या अडचणी असूनही ग्रामीण भागात, विशेष करून कृषी क्षेत्रात वृद्धी कायम आहे असे राष्ट्रपती म्हणाले. नुकतच, कानपुर ग्रामीण जिल्ह्यात असलेल्या माझ्या वडिलांच्या परौंख या गावी दिलेल्या भेटीदरम्यान, ग्रामीण भागातल्या लोकांचं जीवन सुकर बनवण्यासाठी उत्तम पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत हे पाहून, मला खूप बरं वाटलं. शहरी आणि ग्रामीण भागामध्ये असलेलं मानसिक अंतर आता पूर्वीपेक्षा खूप कमी झालं आहे. मुळात भारत हा गावांमध्येच वसलेला आहे. त्यामुळे त्यांना विकासाच्या बाबतीत मागे ठेवून चालणार नाही. म्हणूनच, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी सह, आपल्या शेतकरी बंधू-भगिनीं साठी विशेष योजना राबवण्यावर भर दिला जात असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.
राष्ट्रपतींनी आपल्या संबोधनामध्ये कलम ३७० आणि ३५ अ हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या बदलांचाही उल्लेख केला आहे. आता जम्मू-काश्मीरमध्ये नवजागृती दिसून येत आहे. सरकारनं, लोकशाही आणि कायद्याच्या राज्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व राजकीय पक्षांसोबत विचारविनिमयाची प्रक्रिया सुरू असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. तर जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना, विशेष करुन युवावर्गाला, या संधीचा लाभ उठवण्याची आणि लोकशाही संस्थांच्या माध्यमातून आपल्या इच्छापूर्तीसाठी कामाला लागण्याची विनंती राष्ट्रपतींनी केली आहे.
तर भारताच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणाऱ्या आणि गरज पडल्यावर देशासाठी बलिदान देणाऱ्या सशस्त्र दलातील सर्व शूर जवानांच्या प्रति राष्ट्रपतींनी गौरवोद्गार काढले आहेत. तर त्याच जोडीला प्रवासी भारतीयांची सुद्धा त्यांनी पाठ थोपटली आहे. ज्या देशांमध्ये त्यांनी आपले घर वसवले तिथे आपल्या मातृभूमीची प्रतिमा त्यांनी उंचावली असे कौतुक राष्ट्रपतींनी केले आहे.