अमेरिकन सिटिंग व्हॉलीबॉल स्टार लोरा वेबस्टर हिने २०२० टोकियो पॅरालिम्पिक्स स्पर्धेत तिच्या पाचव्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भाग घेतला असून ती पाच महिन्यांची गर्भवती आहे. स्पर्धेत खेळत असताना बऱ्याचदा गर्भवती आहे हेच विसरायला होते, असे ३५ वर्षीय वेबस्टर हिने सांगितले.
चार वेळा पॅरालिम्पिक पदक विजेती वेबस्टर हिने जुलै महिन्यात इन्स्टाग्रामवर तिच्या गर्भधारणेची घोषणा केली. चौथे बाळ + पाचवी पॅरालिम्पिक स्पर्धा = आम्ही येतोय, असे लिहित वेबस्टरने तिच्या कुटुंबासोबत फोटो शेअर केला होता. गर्भवती असताना स्पर्धेत सहभागी होण्याची ही तिची दुसरी पॅरालिम्पिक स्पर्धा आहे. २०१२ च्या लंडन पॅरालिम्पिक स्पर्धेदरम्यानही वेबस्टर गर्भवती होती.
हे ही वाचा:
पॅरालिम्पिक २०२०: प्रवीण कुमारने विक्रमी कामगिरी करत पटकावले रौप्य पदक
रोनाल्डोचे विश्वविक्रमी ‘गोल’ साध्य!
घरात जुन्या नोटा, बँकेत लाखो रुपये
रशियाच्या ‘झापड’ मध्ये भारताचा सहभाग
गर्भवती असताना कसे खेळायचे हे मला माहित आहे. माझ्या शरीराला आता काय करायचे आहे हे माहित आहे. खेळताना बाळाची काळजी कशी घ्यायची हेही मला माहित आहे. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी आणि मेहनत करून सुवर्ण पदक मिळवणे हेच लक्ष्य आहे, असे लोरा वेब्स्टर हिने सांगितले.
लोरा वेबस्टर ही वयाच्या पाचव्या वर्षापासून व्हॉलीबॉल खेळत असून वयाच्या ११ व्या वर्षी तिला हाडांचा कॅन्सर झाला आणि त्यात तिच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया झाली. २००४ च्या पॅरालिम्पिक स्पर्धेत त्यांच्या संघाने कांस्य पदकाची कमाई केली होती. २००८ आणि २०१२ च्या पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये रौप्य पदक मिळवले होते. तर २०१६ रिओ पॅरालिम्पिकमध्ये संघाने सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती.