राज्यात पाऊस परतणार

राज्यात पाऊस परतणार

महाराष्ट्रामध्ये गेले कित्येक दिवस पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतानाच राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज मुंबई व नागपूर येथील हवामान विभागाने वर्तवला आहे. खासकरून कोकण, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रसह विदर्भात पावसाचा जोर जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं आहे, त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण झालं आहे.

राज्याच्या किनारपट्टीच्या भागात ढगांची दाटी दिसत आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी सक्रीय वातावरण निर्माण झालं आहे, असं हवामान विभागानं सांगितलं आहे. मागील २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली आहे. पुण्यासह मराठवाडा व बाजूच्या परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाच्या नोंदी आयएमडीकडे आल्या आहेत. पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

हे ही वाचा:

ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंनी घेतला मोदींसोबत आईस्क्रिमचा आस्वाद

‘या’ विमा कंपनीचे होणार खासगीकरण

अफगाणिस्तानच्या पतनाला कोण जबाबदार?

लोकल प्रवासासाठी ‘या’ लसीला अधिक मागणी

गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. यामुळे खरिपातील पिकांची वाढ खुंटली होती, तर हलक्या जमिनीतील पिके सुकुन गेली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. शेतातील आंतरमशागतीची कामे पूर्ण करून शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. पाऊस नसल्याने तो चिंतेत होता. गेल्या आठ दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली होती. आता पुढील काही दिवस पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली गेल्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, बाजरी आणि मूग या पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे.

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस प. बंगाल, ओडिसा, बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भामध्ये मुसळधार पाऊस कोसळू शकतो.

Exit mobile version