केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाचे थैमान; जनजीवन विस्कळीत

केरळमधील दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट

केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाचे थैमान; जनजीवन विस्कळीत

केरळ राज्यात मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाला असून या पावसाने राज्यातील काही जिल्ह्यांना चांगलाच फटका दिला आहे. पावसामुळे अनेक सेवा विस्कळीत झाल्या आहेत. तसेच केरळमधील दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मोसमी पाऊस ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला होता. मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस केरळमध्ये वेळेत दाखल होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी म्हटले होते. अशातच आता मान्सूनपूर्व पावसाने मात्र राज्यात दमदार हजेरी लावली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दक्षिण केरळवरील चक्रीवादळाच्या प्रभावाखाली केरळच्या किनारपट्टीपासून दक्षिणपूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने आयएमडीने पुढील दोन दिवस केरळमध्ये अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. केरळच्या अनेक भागात बुधवारी रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. मान्सूनला अजून एक आठवडा बाकी आहे. मात्र, त्याआधीच केरळच्या अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. एर्नाकुलम आणि त्रिशूर जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्रीपासून पावसाने थैमान घातले आहे. केरळच्या इतर आठ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

केरळमध्ये दमदार पाऊस सुरू असल्याने केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अचानक ढगफुटी किंवा पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच काही ठिकाणी सखल भागात भूस्खलन होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. याबरोबरच मच्छिमारांनी केरळ किनारपट्टीवर समुद्रात जाऊ नये, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

हे ही वाचा:

प. बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान टीएमसी नेत्याची हत्या

आता व्हीआयपींनाही राम मंदिरात फोन नेण्यास बंदी

नुपूर शर्मांच्या हत्येचा कट: मौलवी सोहेलच्या अटकेनंतर आणखी दहशतवादी पकडले

हम तो डुबेंगे सनम…काँग्रेसने स्पष्ट केला इरादा

मान्सून केरळमध्ये ३१ मे पर्यंत दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तर महाराष्ट्रात मान्सून १० ते ११ जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा मान्सूनचा पाऊस सामान्य राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

Exit mobile version