प्रतीक्षा तोंडवळकर यांची प्रेरणादायी कहाणी
प्रतीक्षा तोंडवळकर अवघ्या २०व्या वर्षी विधवा झाल्या. भलंमोठं प्रश्नचिन्ह समोर होतं. शिक्षण नव्हतं. ज्या स्टेट बँक ऑफ इंडियात पती बायंडर म्हणून काम करत होते, तिथेच झाडू मारण्याची नोकरी मिळाली. आज याच प्रतीक्षा स्टेट बँकेच्या सहाय्यक महाव्यवस्थापकपदावर पोहोचल्या आहेत. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाचे सर्वस्तरावर कौतुक होते आहे.
प्रतीक्षा तोंडवळकर यांचा जन्म पुण्याचा. १९६४मध्ये एका गरीब कुटुंबात प्रतीक्षा यांचा जन्म झाला. वयाच्या १६व्या वर्षीच त्यांचा विवाह आईवडिलांनी सदाशिव कडू यांच्याशी लावून दिला. त्यावेळी प्रतीक्षा यांनी दहावी पूर्णही केली नव्हती. कडू मुंबईत काम करत होते. स्टेट बँकेत बाइंडर म्हणून ते काम करत असत. मुंबईत गेल्यावर वर्षभराने त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव विनायक. नवजात बालकासह आपल्या गावी जाऊन तिथे कुलदेवतेचा आशीर्वाद घेण्यासाठी कडू कुटुंबीय निघाले. त्यानंतर आपले आयुष्यच बदलून जाईल, याची कल्पनाही प्रतीक्षा यांना नव्हती. याच दरम्यान कडू यांना अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या २०व्या वर्षी प्रतीक्षा यांना वैधव्य आले. आता एवढे आयुष्य लहान मुलाला सोबत घेऊन जगायचे तरी कसे याची चिंता प्रतीक्षा यांना होती.
नवऱ्याचे राहिलेले पैसे घेण्यासाठी त्या स्टेट बँकेत गेल्या. बँकेत त्यांनी नोकरीसंदर्भात विचारणा केली. शिक्षण तर नव्हतं. मग पार्टटाइम झाडू मारण्याचे काम प्रतीक्षा यांनी स्वीकारले. सकाळी दोन तास स्वच्छतागृहाची साफसफाई करायची, फर्निचर स्वच्छ करायचे असे काम सुरू झाले. महिन्याला ६०-६५ रुपये मिळत. उरलेल्या वेळेत इतर कामे त्या करत असत. हे काम करत असताना मनात येत होतं की आपण या कामासाठी जन्मलेलो नाही. बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आपणही काम करू शकतो. मग त्यांचा वेगळा संघर्ष सुरू झाला.
हे ही वाचा:
विचार बदलला म्हणून काय ठार माराल? उदय सामंत यांचे प्रत्युत्तर
तालिबानच्या छळामुळे शीखांनी सोडले अफगाणिस्तान; दिल्लीत येणार
अविनाश भोसलेंचा ड्युप्लेक्स फ्लॅट तर छाब्रियांची जमीन जप्त
राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंग, बॅडमिंटनमध्ये भारताला रौप्यपदक
आपण १०वीची परीक्षा कशी देऊ शकतो, याची विचारणा त्यांनी केली. बँक अधिकाऱ्यांशी त्या भेटल्या. त्यांनीही त्यांना मार्गदर्शन केले. १०वीच्या परीक्षेचे फॉर्म त्यांना भरून दिले. अभ्यासासाठी महिन्याभराची सुट्टीही दिली. त्यांच्या कुटुंबियांनी पुस्तकांची व्यवस्था केली. त्यानंतर प्रतीक्षा यांनी अभ्यास सुरू केला. प्रश्नांची उत्तरे इतरांशी बोलून मिळविली. १०वीची परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या. आपल्या मुलाचे भवितव्य घडविण्यासाठी आपल्याला आर्थिक तणावातून बाहेर यावे लागेल, याची त्यांना कल्पना होती. बँकिंग परीक्षा देण्याचाही त्यांनी विचार सुरू केला. मग विक्रोळीत रात्रविद्यालयात शिक्षण घ्यायला सुरुवात झाली. १२वीची परीक्षाही त्या उत्तीर्ण झाल्या. एवढेच नव्हे तर १९९५ला त्या सायकोलॉजी विषयातून पदवीधरही झाल्या. त्यामुळे त्यांना बँकेत क्लर्क पदावर बढती मिळाली.
१९९३ला प्रतीक्षा यांनी दुसरा विवाह केला. प्रमोद तोंडवळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पण प्रमोद यांच्या कुटुंबियांनी प्रतीक्षा यांना सहाय्य केले नाही. त्यामुळे प्रमोद यांनी कुटुंबियांशी फारकत घेत आपले कुटुंब सांभाळले. अर्धांगवायूचा झटका आलेला असतानाही त्यांनी प्रतीक्षा यांना सतत पाठिंबा दिला. त्यांना दोन मुलेही आहेत. पहिला मुलगा विनायक यानेही आपल्या आईला नंतर मदत केली. २००४मध्ये त्या ट्रेनी अधिकारी झाल्या. नंतर त्यांच्याकडे सहाय्यक महाव्यवस्थापक हे पद आले. आता त्यांना निवृत्तीसाठी दोन वर्षे आहेत. पण ३७ वर्षे केलेल्या संघर्षानंतर त्यांना त्याचे फळ मिळाले. आज त्या समाधानी आहेत. मागे वळून बघताना त्यांना वाटते की, माझी ही कहाणी नक्कीच जे तणावाखाली आहेत त्यांना प्रेरणादायी ठरेल.