मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी शनिवारी जालना येथील आंतरवाली सराटी गावात सभा आयोजित केली होती.मनोज जरांगे यांनी या सभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवारांवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी जरांगे पाटलांच्या टीकेला उत्तर दिले आहे.मराठा आरक्षणाचा बाऊ करून समाजात फूट पाडण्याचे जे काम मुघलांनी केलं, तेच शरद पवार आणि काँग्रेसच्या नेतृत्वात तुम्ही करू नका, असे प्रसाद लाड म्हणाले आहेत.
प्रसाद लाड म्हणाले की, “मराठा आरक्षणावरून महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळा रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे खरंच याची मराठा समाजाला विचार करण्याची गरज आहे. खऱ्या अर्थाने मराठा म्हणून मराठा आंदोलनामध्ये आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी काम केलं. २०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण दिले, ते आरक्षण हायकोर्टात देखील टिकले. मात्र, पुढे उद्धव ठाकरे यांचे सरकार आल्यावर त्यांनी पाठपुरावा न केल्याने ते आरक्षण गेलं हे समाजाला सांगावे लागेल. मनोज जरांगे यांचा आदर आहे. समाजासाठी आपण काम करत असल्याचे देखील मान्य आहे. पण ज्या पद्धतीने तुम्हाला चालवलं जात आहे त्याचा आम्ही निषेध करतो.
आम्हा मराठा समाजाला आरक्षण हवं आहे आणि तेही १०० टक्के आरक्षण हवं आहे. आम्हाला कुठल्याही ओबीसी, एनटीमध्ये दिलेलं आरक्षण नको पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात १०० टक्के मराठ्यांना आरक्षण मिळणार. त्यामुळे मराठा आरक्षणाचा बाऊ करून समाजात फूट पाडण्याचे जे काम मुघलांनी केलं, तेच शरद पवार आणि काँग्रेसच्या नेतृत्वात तुम्ही करू नका. ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे. मराठा समाज एक आहे एक राहील आणि आरक्षण घेतल्याशिवाय गप्प राहणार नाही, असे प्रसाद लाड म्हणाले.
हे ही वाचा:
बोगस पासपोर्ट प्रकरणी सीबीआयचे ५० ठिकाणी छापे
कॅनडात तीन हिंदू मंदिरांची तोडफोड आणि चोरी
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा नुखबा फोर्सचा सर्वोच्च कमांडर ठार!
भवानी शक्तीपीठ हे संस्कारांचे उर्जा केंद्र
आपल्याला ओबीसीमधून आरक्षण हवं आहे. मात्र आम्हाला पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण द्यायचा आहे, ज्या पद्धतीने फडणवीसांनी दिलं होतं. गर्दी मराठा समाजाला नवीन नाही. जेव्हा ५० पेक्षा अधिक मोर्चे निघाले त्यावेळी देखील यापेक्षा अधिक गर्दी होती. ही कुण्या एकट्या माणसाच्या नेतृत्वाची गर्दी नसून, आरक्षणासाठीची गर्दी आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने तुमचा बोलविता धनी तुमच्याकडून काम करून घेत आहे, ज्या पद्धतीने तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात, मला वाटतं हे न शोभणारं कृत्य असल्याचे लाड म्हणाले.
एका ब्राह्मण मुख्यमंत्र्याने मराठा समाजाला आरक्षण दिलं हे विसरून चालणार नाही
मागचा जर तुम्ही इतिहास पाहिला, तर शरद पवार चार वेळेस मुख्यमंत्री राहिले. विलासराव देशमुख ९ वर्षे मुख्यमंत्री राहिले. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, शंकरराव चव्हाण, बाबासाहेब भोसले हे देखील मुख्यमंत्री राहिले. या लोकांनी एवढे वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवलं. अण्णासाहेब जावळे यांनी स्वतःचा देह त्यागला तरीही मराठा मुख्यमंत्री आरक्षण देऊ शकले होते. पण ५० वर्षांच्या इतिहासानंतर एका ब्राह्मण मुख्यमंत्र्याने मराठा समाजाला आरक्षण दिलं हे देखील विसरून चालणार नाही, असेही प्रसाद लाड म्हणाले.