चांद्रयानाच्या लँडर मधून प्रज्ञान रोव्हर बाहेर पडल्याचा व्हिडीओ शुक्रवार, २५ ऑगस्ट रोजी शेअर केला होता. आता इस्रोने नवा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये प्रज्ञान रोव्हर बाहेर पडले असून रोव्हर आता चंद्रावर फिरत आहे, असं दिसत आहे. लँडरमधील कॅमेऱ्यात रोव्हरचा प्रवास कैद झाला आहे. इस्रोने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर शेअर करत माहिती दिली आहे.
“प्रज्ञान रोव्हर दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी ‘शिवशक्ती’ पॉइंटभोवती फिरत आहे.” अशा कॅप्शनसहित इस्रोने प्रज्ञान रोव्हरचा व्हिडिओ ट्वीट केला आहे. यामध्ये रोव्हर चंद्रावर फिरत असल्याचं दिसत आहे. प्रज्ञान रोव्हर लँडरमधून खाली उतरतानाचा व्हिडिओ इस्रोकडून शेअर करण्यात आला होता. त्यानंतर आता हा नवा व्हिडीओ इस्रोने शेअर केला आहे. आता रोव्हर चंद्रावर फिरून तिकडच्या मातीचे नमुने, मातीमध्ये असलेल्या पाण्याच्या प्रमाणाचा शोध, लँडरचे फोटो काढणे या गोष्टी करणार आहे.
Chandrayaan-3 Mission:
🔍What's new here?Pragyan rover roams around Shiv Shakti Point in pursuit of lunar secrets at the South Pole 🌗! pic.twitter.com/1g5gQsgrjM
— ISRO (@isro) August 26, 2023
चांद्रयान- ३ हे चंद्रावर १४ दिवस विविध प्रकारचे संशोधन करणार आहे. चंद्रावर पाणी आहे का? पाण्याचे काही अंश आढळतात का? याचा अभ्यास केला जाणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मोठमोठे डोंगर-खड्डे असून या भागात सूर्याची किरणे तिरपी पडतात. त्यामुळे बहुतांश भागामध्ये अंधार असतो. यातील अनेक खड्डे अब्जावधी वर्षापासून अंधारात आहेत. कायम अंधार असल्यामुळे हा भाग प्रचंड थंड आहे. शिवाय दुर्लक्षितही आहे. या भागात पाणी आणि खनिज सापडण्याची शक्यता अधिक आहे. खगोलीय संशोधनाच्या दृष्टीने हा भाग महत्वाचा आहे.
हे ही वाचा:
हिमाचल प्रदेशात भूस्खलन; ५४ घरे खचल्याची भीती
पृथ्वी ते चंद्रापर्यंतच्या अंतरापर्यंतचे रस्ते गावागावांत बनले
भारताच्या चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर ब्रिटनने ओकली गरळ
जगद्गुरू रामभद्राचार्य यांच्या अमृतमहोत्सवी जन्मोत्सवाची घोषणा
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान मोहिमेत सहभागी असलेल्या सर्व शास्त्रज्ञांना भेटून शनिवारी बंगळुरू येथील इस्रो सेंटरमध्ये जाऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी चांद्रयान – ३ ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाला ‘शिवशक्ती’ असे नाव दिले. तर, चांद्रयानाने ज्या दिवशी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलं त्या दिवशी म्हणजे २३ ऑगस्टला ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ साजरा केला जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.