मुंबई आणि नजीकच्या उपनगरात जुलैच्या मध्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये पावसाचा जोर जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत कायम होता. या पावसामुळे ठाणे शहरातील अंतर्गत तसेच मुख्य मार्गांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. गेल्या दोन – तीन दिवसापासून पालिकेने तात्पुरती खड्डेभरणी सुरू केली आहे. या खडीमुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळत असला, तरी पावसाच्या सरीनंतर मात्र ही खडी रस्त्यावर पसरून पुन्हा खड्डे उखडत आहेत. पसरलेल्या खडीमुळे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. हे खड्डे कधी बुजणार, कधी सुरक्षित प्रवास करता येणार असा सवाल लोक आता विचारू लागले आहेत.
पाऊस अजूनही सुरू असल्यामुळे खड्डे बुजवण्यासाठी काँक्रीट तसेच डांबराचा वापर करणे सध्या शक्य नाही, असे अभियांत्रिकी विभागाने स्पष्ट केले आहे. ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई – नाशिक महामार्गावरील कॅडबरी जंक्शन, नितीन कंपनी जंक्शन तसेच ज्युपिटर रूग्णालयासमोरील रस्त्यावर खड्डे पडले असून या मार्गांवर अवजड वाहनांची वर्दळ असतेच शिवाय रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खड्ड्यांसोबतच काही मार्गांवरचे पेव्हर ब्लॉक उखडले आहेत. या खड्ड्यांमध्ये वाहने आपटून वाहनांचे नुकसान होत आहे. घोडबंदर मार्गावरील माजीवाडा, कापूरबावडी तसेच मानपाडा येथील सेवा रस्त्यांसोबतच मुख्य मार्गांवरही खड्डे पडले आहेत. बाळकुम येथील जकात नाक्याजवळील रस्त्यांवर तसेच मीनाताई ठाकरे चौक आणि वंदना भागातील उड्डाणपुलावरही खड्डे पडले आहेत. शहरातील सर्वच मुख्य आणि अंतर्गत मार्गांना खड्ड्याने वेढलेले असल्यामुळे ठाणेकर त्रस्त झाले आहेत.
हे ही वाचा:
भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन करूनही का ट्रोल झाला फरहान अख्तर?
२०२१ शिखर सावरकर पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन
मोदी सरकारने काँग्रेसची अजून एक चूक सुधारली
ठाणे शहरातील पाऊस पूर्णपणे थांबण्याची वाट पाहत असून त्यानंतरच डांबर आणि सिमेंटच्या साहाय्याने शहरातील खड्डे बुजवले जातील. शहरातील पाऊस अजूनही पूर्ण थांबलेला नाही त्यामुळे तात्पुरता उपाय म्हणून बारीक खडीच्या साहाय्याने खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे अशी प्रतिक्रिया ठाणे महापालिकेचे नगर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दिली.