ठाणे महापालिका क्षेत्रातील खड्डे दुरुस्तीची कामे निविदा मंजूर होण्याच्या काही महिने आधीपासूनच सुरू करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे कामाच्या पर्यवेक्षणामध्ये हलगर्जीपणा झाला, कामे अनियंत्रित राहिली आणि त्याचा परिणाम म्हणजे पावसाळ्यात प्रवाशांना, वाहन चालकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागला, असा आरोप स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केला.
शहरातील नऊ प्रभागांच्या रस्ते दुरुस्तीसाठी २.५ कोटी रुपयांच्या निविदा मे महिन्यात काढण्यात आल्या होत्या, पण त्या निविदांवर सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात कार्यादेश काढण्यात आल्याचे प्रशासनाकडून कबूल करण्यात आले. काही प्रशासकीय आणि आर्थिक बाबींमुळे कार्यादेशाला विलंब झाल्याचे सांगण्यात आले.
विधान परिषदेचे सदस्य आणि भाजपचे ठाणे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी सांगितले की, ‘निविदा वेळेत काढण्यात आल्या होत्या. मात्र, निविदा वेळेत मंजूर झाल्या नाहीत आणि कार्यादेशही निघाले नव्हते. कार्यादेशापूर्वीच कंत्राटदाराने कामाला सुरुवात केली होती.’ निधी मिळवण्यासाठी वेळ गेल्याचे ठाणे पालिकेचे शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी सांगितले.
हे ही वाचा:
शाहरुख खानचा मुलगा क्रूझ छापाप्रकरणी ताब्यात?
उलट्या मार्गाने जाणाऱ्या १३० दुचाकीस्वारांना पोलिस रोज करताहेत सरळ
क्रूझवर रंगली पार्टी, भरसमुद्रात एनसीबीची कारवाई
तुमच्या राजकारणापायी शेतकऱ्यांचा बळी देऊ नका
संबंधित निविदेची फाईल विलंबित झाली होती. पालिकेची डगमगलेली आर्थिक परिस्थिती पाहता तेव्हा वित्त आणि लेखा परीक्षण विभागाला अधिक बारकाईने तपसणी करावी लागली होती. जनतेच्या सोयीसाठी कमी बोली लावणाऱ्या कंत्राटदाराला काम सुरू करण्यास सांगण्यात काहीही बेकायदेशीर नसल्याचे अहिरे यांनी सांगितले.
मुंबई आणि उपनगरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ठाणे शहरातील मुख्य मार्ग आणि अंतर्गत मार्गांवर रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. दरवर्षी महापालिकेकडून रस्त्यांच्या डागडुजीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो तरीही रस्त्यांची परिस्थिती सुधारत नाही. शहरातील प्रमुख रस्ते आणि उड्डाणपुलांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे, तर कित्येक नागरिकांनी आपला प्राणही गमावला आहे.