महाराष्ट्रातील वैशाख वणव्यावर पावसाच्या सरींचा उतारा

महाराष्ट्रातील वैशाख वणव्यावर पावसाच्या सरींचा उतारा

राज्याच्या काही भागांत गारपीटीसह वादळी पावसाची शक्यता

संपूर्ण राज्यामध्ये तापमानाचा पारा चांगलाच चढला आहे. आंब्याच्या सुवासासोबत दुपारच्या वेळेस वैशाख वणव्याच्या झळा देखील बसत आहेत. उन्हाळ्याच्या तापमानाने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी दिलासादायक शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने सिंधुदुर्ग, सोलापूरसह राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

राज्यातील उकाड्याने हैराण झालेल्या जनतेसाठी पावसाचा अंदाज दिलासादायक ठरला आहे. गेले दोन दिवस सलग सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. शुक्रवारी देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या लखलखाटासह पावसाने हजेरी लावली होती. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात पाऊस तर काही भागात गारपीट होण्याचा इशारा देखील दिला आहे.

हे ही वाचा:

धक्कादायक……!! कालव्यात सापडली शेकडो रेमडेसिवीर इंजेक्शने!!

कोविड पाठोपाठ बळावतोय आणखी एका आजाराचा धोका

सरकारची वृत्ती ‘गरज सरो वैद्य मरो’ अशीच

कोविड रुग्णांना भारतीय बनावटीच्या ‘वायुपुत्रा’ची साथ

सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. मात्र, खरिप हंगामासाठी शेतीची मशागत करणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्याने काही ठिकाणी पडझड झाली व फळपिकांचे मोठे नुकसान झाले.आज ही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे कुडाळ तालुक्यासह कणकवली व वैभववाडी तालुक्याला या पावसाने झोडपून काढले. नागरिकांनी त्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे करण्यात आले आहे.

सोलापूरमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार ८ मे रोजी सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर ९ ते ११ मे दरम्यान जिल्ह्यात तुरळक प्रमाणात पाऊस होऊ शकतो.

पुढील चार दिवस राज्यासाठी महत्वाचे

राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाडा येथे पावसाच्या सरी बरसत आहेत. भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवस महत्त्वाचे असल्याचे सांगत राज्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच हवामान खात्याने काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला आहे. साताऱ्यात काही ठिकाणी गारपीटीसुद्धा नोंद झाली होती. या पार्श्वभूमीवर आता येत्या १ जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सातारा, सागंली, कोल्हापूर, रत्नागिरी, हिंगोली आणि  वाशिम जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

Exit mobile version