मनीष मल्होत्रा डिझाइन करणार एअर इंडिया कर्मचाऱ्यांचे गणवेश

एअर इंडियाचा मल्होत्राशी करार

मनीष मल्होत्रा डिझाइन करणार एअर इंडिया कर्मचाऱ्यांचे गणवेश

एअर इंडियाच्या सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांचे नवीन गणवेश सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा डिझाईन करणार आहे. यामध्ये केबिन क्रू, कॉकपिट क्रू आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश असेल.

 

एअर इंडियाने २८ सप्टेंबर रोजी मनीष मल्होत्रा यांच्यासोबतच्या भागिदारीची घोषणा केली. मनीष मल्होत्रा यांनी आतापर्यंत अनेक भारतीय सेलिब्रिटी वधूंचे पोषाख डिझाइन केले आहेत. आता ते एअर इंडियाच्या १० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचे पोषाख डिझाइन करणार आहेत.

 

एअर इंडियाने जगभरात स्वत:चा ब्रँड तयार करण्यासाठी कंबर कसली आहे. एअर इंडियाला सर्वच प्रकारे अत्याधुनिक रूप यावे, यासाठी कंपनी कामाला लागली आहे. त्याचाच एक भाग म्हणून एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना नवा गणवेश मिळणार आहे. सन २०२३च्या अखेरपर्यंत एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना हा नवा गणवेश मिळेल.

 

 

‘देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रातील अम्बॅसेडर असलेल्या एअर इंडियाशी जोडले जाणे, ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यांना नवा गणवेश घडवणे हा आनंददायी प्रवास असेल आणि मी या कामासाठी उत्सुक आहे,’ अशी प्रतिक्रिया मनीष मल्होत्रा याने दिली आहे.

 

हे ही वाचा:

राजस्थानमध्येही भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी?

जुहू समुद्र किनाऱ्यावर गणपती विसर्जनासाठी तैनात तरुणावर वीज कोसळली

आशियाई स्पर्धा: नेमबाजांची ५० मी रायफलमध्ये ‘सुवर्ण’ कामगिरी

राजस्थानमध्येही भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी?

मनीष मल्होत्रा आणि त्यांच्या टीमने एअर इंडियाच्या फ्रंटलाइन कर्मचार्‍यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या विशेष गरजा चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली जात आहे. तसेच, फिटिंग सेशनही होत आहेत.
हिंदुस्तान टाइम्सने याआधी गणवेशाच्या निवडीतून साड्या पूर्णपणे बाद केल्या जाऊ शकत नाहीत, असे वृत्त दिले होते. त्यामुळे तयार साड्यांना प्राधान्य दिले जाईल किंवा पारंपरिक साड्यांशी साधर्म्य साधणारा गणवेश दिला जाऊ शकतो. यातून किचकट अशा ड्रेपिंगला कदाचित बाद केले जाईल.

 

 

गेल्या सहा दशकांपासून एअर इंडियाच्या महिला कर्मचारी साडी नेसत आहेत. सन १९६२मध्ये दिवंगत जेआरडी टाटांनी विमान कर्मचाऱ्यांचा स्कर्ट, जॅकेट आणि टोप्या हा गणवेश बाद केला होता. एअर इंडियाचा नवा गणवेश त्यांच्या लोगोतील लाल आणि सोनेरी छटेशी साधर्म्य साधणारा असेल, असे सूत्रांनी सांगितले.

Exit mobile version