मुंबई महानगरप्रदेशाच्या प्रदुषणात वाढ

मुंबई महानगरप्रदेशाच्या प्रदुषणात वाढ

महाराष्ट्रातील सर्वात प्रदुषित १० स्थळांपैकी ६ ठिकाणे मुंबई महानगर प्रदेशामधील

मागील वर्षी कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे जगातील अनेक शहरांसोबतच मुंबईतील आकाश देखील शुभ्र निळे दिसले होते. परंतु आता सगळे व्यवहार पूर्ववत सुरू झाल्यानंतर मुंबई महानगर प्रदेशातील प्रदुषणात देखील वाढ झालेली पहायला मिळाली आहे. एकेकाळी विषारी धुरके हे केवळ हिवाळ्यात आढळत होते, आता ते तसे राहिले नाही. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे.

अंधेरीमधील चकाला, कुलाबा येथील नेव्ही नगर, नवी मुंबई येथील नेरूळ, माझगांव, मालाड पश्चिम आणि देवनार ही मुंबई महानगर प्रदेशातील ६ ठिकाणे महाराष्ट्रातील १० सर्वात प्रदुषित ठिकाणे ठरली आहेत. एनसीएपी ट्रॅकरच्या सहाय्याने प्राप्त झालेल्या अहवालानुसार या सर्व ठिकाणी पीएम २.५ मोठ्या प्रमाणात आढळून आले होते.

हे ही वाचा:

जोकोविचने सर केला ‘एव्हरेस्ट’

बीएसएफकडून चीनी गुप्तहेराला अटक

सिनियर अकाऊंटंटकडून ज्युनियर महिलेचे लैगिंक शोषण

नरेंद्र मोदींना संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाकडून शाबासकी

एनसीएपी ट्रॅकर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड येथून डेटा गोळा करून त्याचा वापर देशातील प्रदुषणावर लक्ष ठेवण्यासाठी आणि मोजमापनासाठी करतो. सरकारचे देशातील प्रदुषण ३० टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य असून स्वच्छ हवेचे उद्दिष्ट सरकारने समोर ठेवले आहे.

मुंबईत २०१९ मध्ये महाराष्ट्रातील १० सर्वात प्रदुषित स्थळांपैकी तीन स्थळे होती. यामध्ये ठाण्यातील पिंपळेश्वर, नवी मुंबईतील महापे आणि सायन या स्थळांचा समावेश होता.

तज्ज्ञांच्या मते मुंबईतील सर्वाधिक प्रदुषण हे वाहनांमुळे होते. त्याखालोखाल धुळ आणि बांधकामामुळे होणाऱ्या प्रदुषणाचा, कचऱ्याच्या जाळण्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदुषणाचा समावेश होतो. त्याप्रमाणे कारखानदारी प्रदुषणाचा देखील समावेश यामध्ये होतो.

मागील वर्षी कोविडच्या पहिल्या लाटेमुळे लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर एकंदरितच अनेक शहरातील प्रदुषणाचे प्रमाण कमी झाले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनांप्रमाणे शुद्ध हवा म्हणण्याइतके प्रदुषण कमी झाले होते. त्यानंतर प्रदुषणात वाढ झाली आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनातून ही बाब उघड झाली आहे.

Exit mobile version