दिल्ली- एनसीआर भागातील वायू प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस अधिक वाढत असून परिस्थिती गंभीर बनत आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पातळीवर उपाय म्हणून केंद्र सरकारच्या समितीने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने सोमवार, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅनचा (GRAP) चौथा टप्पा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी सकाळी दिल्लीत हवेची गुणवत्ता खराब झाली आणि धुक्याच्या दाट चादरीमुळे दृश्यमानता कमी झाली आहे. हवेच्या गुणवत्तेची पातळी गंभीर पातळीवर घसरली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत सकाळी ७ वाजता हवा गुणवत्ता निर्देशांक ४८३ इतका होता. त्यामुळे ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅनचा (GRAP) चौथा टप्पा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी गुरुवारी दिल्ली- एनसीआरमध्ये GRAP- ३ लागू करण्यात आला होता. दिल्लीमध्ये GRAP- ४ लागू झाल्यानंतर अनेक नियम लागू होणार आहेत. या अंतर्गत आवश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या आणि अत्यावश्यक सेवांशी जोडलेल्या सर्व सीएनजी- इलेक्ट्रिक ट्रक वगळता इतर वाहनांच्या प्रवेशावर बंदी असणार आहे. याशिवाय दिल्लीत नोंदणीकृत डिझेल वाहने, मध्यम आणि अवजड वाहनांवरही बंदी घालण्यात आली आहे. दिल्लीतील प्राथमिक शाळांशिवाय सहावीच्या वरच्या शाळाही बंद राहतील.
दिल्लीत दाट धुके असून सध्या गाड्यांची वाहतूक सुरू आहे. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने (DIAL) एक नोटीस जारी केली आहे. दिल्ली विमानतळावर कमी दृश्यमानता असून सर्व फ्लाईट ऑपरेशन्स सध्या सुरळीत सुरू आहेत. तरी प्रवाशांना अद्ययावत फ्लाईट माहितीसाठी संबंधित एअरलाइनशी संपर्क साधण्याची विनंती केली आहे.
हे ही वाचा :
व्होट जिहादकरून मतं मागतील तर मतांचं धर्मयुद्ध करावे लागेल, नाहीतर जगू देणार नाहीत
आदिवासी बांधवांच्या जमिनी हडपणाऱ्यांना हद्दपार करा!
पंतप्रधान मोदींकडून ‘द साबरमती रिपोर्ट’चे कौतुक, म्हणाले- ‘सत्य बाहेर येत आहे’
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक
आग्रामध्ये वायू प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाल्याने ताजमहालला धुक्याच्या जाड थराने व्यापले असून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार (CPCB) आग्रा येथील हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत आहे. रविवारी दिल्लीतील हवेची गुणवत्ता खराब झाली आणि दुपारी ४ वाजता AQI ४४१ ची नोंद झाली. त्यामुळे दिल्ली देशातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर ठरले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, हरियाणातील बहादूरगडमध्ये सर्वाधिक ४४५ AQI होते, त्यानंतर दिल्लीत ४४१, हरियाणाच्या भिवानीमध्ये ४१५ आणि राजस्थानच्या बिकानेरमध्ये ४०४ होते.