राजकीय वर्तुळात साऱ्यांचं लक्ष असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज, १० मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. जनतेचा कौल कोणाला मिळणार याकडे लक्ष असणार आहे.
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालं आहे. राज्यभरातील एकूण ५८ हजार ५४५ मतदान केंद्रांवर मतदान करण्याची सुविधा प्राप्त करुन देण्यात आली आहे. तर, मतदानादरम्यान एकूण ७५ हजार ६०३ बॅलेट युनिट (BU), ७० हजार ३०० कंट्रोल युनिट (CU) आणि ७६ हजार २०२ व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) वापरण्यात येणार आहेत.
राज्यभरातील एकूण ५ कोटी ३१ लाख ३३ हजार ५४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी एकूण २ हजार ६१५ उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये २ हजार ४३० पुरुष तर १८४ महिला आणि एक तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. १३ मे ला निकाल लागणार आहे.
हे ही वाचा:
८६ वर्षीय डॉक्टरची नोकराने केली हत्या
‘चॅटजीपीटी’चा पहिला बळी; चीनमध्ये खोट्या अपघाताची बातमी करणाऱ्याला अटक
धक्कादायक!! इराणमध्ये यावर्षी २०३ जणांना फासावर लटकवले!
मॉलमध्ये खरेदी करताना भारतीय वंशाच्या महिलेला लागली गोळी आणि…
सलग दोन वेळा कोणताही पक्ष सत्तेत नाही
विशेष म्हणजे कर्नाटक राज्यात सलग दोन वेळा कोणत्याही राजकीय पक्षाकडे सत्ता आलेली नाही. दर पाच वर्षांनी राज्यात सत्ताबदल होत आला आहे. त्यामुळे आता हा समज बदलणार का याकडे लक्ष असणार आहे.