बृहन्मुंबई पोलिस दलातील सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी बांधवांना पोलिस कल्याण निधीतून दिवाळी भेट योजनेच्या अंतर्गत अवघ्या ७५० रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. शिवाय, ही रक्कम रोख दिली जाणार नाही तर पोलिस बांधवांनी एवढ्या रकमेची खरेदी पोलिस सबसिडिअरी कॅन्टीन, नायगाव येथे करायची आहे. तसेच ताडदेव, वरळी, कलिना, मरोळ, राजभवन येथील उपकेंद्रांत ही खरेदी करता येणार आहे.
पण सर्व पोलिस बांधवांना अवघे ७५० रुपये भेट स्वरूपात मिळत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. ३० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत पोलिसांना विनामूल्य खरेदी करता येणार आहे. या भेटीत नेमके पोलिसांच्या हाती काय लागणार आहे, हे मात्र कळायला मार्ग नाही.
यासंदर्भात मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या स्वाक्षरीच्या पत्रात या भेटीसंदर्भातील नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. रक्कम अवघी ७५० असली तरी नियम मात्र अत्यंत कठोर आणि कडक ठेवण्यात आले आहेत.
पोलिसांनी आपल्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून ७५० रुपयांची खरेदी करायची आहे. त्यापेक्षा अधिक रकमेची खरेदी झाल्यास वरची रक्कम पोलिसांना स्वतःच्या खिशातून भरावी लागणार आहे.
ही योजना फक्त मुंबई पोलिसांसाठीच असेल. इतर पोलिस दलातील कर्मचारी याचा लाभ घेऊन शकणार नाहीत, असे या पत्रकात म्हटले आहे.
हे ही वाचा:
त्या ‘दाढीवाल्या’ने नवाब मलिकना विचारला जाब
दूर सरले कोरोनाचे मळभ, सजला दिवाळीचा बाजार!
आर्यन खान आज रात्रीही तुरुंगातच
२२ कुठे फक्त ८ नगरसेवक राष्ट्रवादीत
या योजनेचा लाभ फक्त एकदाच पोलिसांना घेता येईल त्याची खबरदारी कॅन्टीनच्या व्यवस्थापकांना ठेवायची आहे. याबाबत नियंत्रण अधिकारी म्हणून वरिष्ठ पोलिस निरीक्षक देखरेख ठेवतील.
पोलिस दलातील कर्मचारी कोरोनाच्या काळात रात्रंदिवस झटत होते. अनेकांनी त्यात आपले प्राण गमावले. त्यामुळे पोलिसांना देण्यात आलेल्या या तुटपुंज्या दिवाळी भेटीबद्दल आश्चर्य आणि संतापही व्यक्त होत आहे.