गणेशोत्सव तोंडावर असतांना मुंबई पोलीस दलात झालेल्या बदल्या पोलीस दलात चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबईत गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, लाखोंच्या संख्येने राज्यभरातून गणेशभक्त मुंबईत येत असताना मुंबई पोलीस दलात झालेल्या बदल्यामुळे मुंबईच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी चर्चा पोलीस दलात दबक्या आवाजात सुरू आहे.
शनिवारी मुंबई पोलीस दलातील जवळपास ३० सहाय्यक पोलीस आयुक्त, ४० पेक्षा अधिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि ७ हजार पोलीस अंमलदार आणि एएसआय (सहाय्यक फौजदार) यांच्या बदल्याचे आदेश काढण्यात आहे आहे. त्यात मुंबईतील काळाचौकी, भोईवाडा, माटुंगा, गिरगावातील व्ही. पी. रोड, एल.टी.मार्ग,आग्रीपाडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.
मुंबईत गणेशोत्सव हा उत्सव मोठया प्रमाणात साजरा केला, दहा दिवस साजरा होणारा हा उत्सवातराज्यभरातील तसेच देशातून लाखोच्या संख्येने गणेशभक्त मुंबईत दर्शनासाठी येतात. त्यात अतिमहत्त्वाच्या व्यक्ती देखील, राजकीय नेते, सेलिब्रिटी लालबागचा राजा, गणेश गल्ली, माटुंग्यातील जीएसबी मंडळ, गिरगाव सह मुंबईतील लहान मोठ्या मंडळाना भेटी देतात. मुंबईतील हा उत्सव दहशतवादी संघटनाच्या निशाण्यावर देखील आहे, मागील अनेक वेळा गणेशोत्सवाच्या काळात मुंबई पोलिसांना धमकीचे कॉल देखील आले होते. गुन्हेगारी प्रवृत्तीचे गुंड, पाकीटमार, सोनसाखळी चोर, मोबाईल फोन चोर टोळ्या गणेशोत्सवात गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी या उत्सवात सामील होत असतात.
एकीकडे मुंबईत गणेशोत्सवाला घेऊन मुंबईतील गणेशमंडळाची महिनाभर आधीच सजावटीसाठी तयारी सुरू असते तर दुसरीकडे या उत्सवाला गालबोट लागू नये म्हणून मुंबई पोलिसां कडून सुरक्षेचा उपाय म्हणून तयारी सुरू असते, दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज असते. मुंबई पोलिसांकडून सुरक्षेसाठी मुंबईत बंदोबस्तासाठी बाहेरून पोलीस फोर्स बंदोबस्तासाठी मागविण्यात येते. मुंबई पोलीस दलाच्या अधिकारी यांच्याकडून मंडळाच्या पदाधिकारी यांच्या बैठका घेऊन सुरक्षेबाबतची माहिती घेतली जाते. परंतु यंदा गणेशोत्सवाला काही दिवस उरलेले असताना मुंबई पोलीस दलात करण्यात आलेला मोठा फेरबदल,अधिकारीच्या बदल्याना घेऊन पोलीस दलात चिंतेचे वातावरण आहे. नवीन येणाऱ्या अधिकारी आणि अंमलदार यांना त्या परिसरातील अधिक माहिती नसल्यामुळे या उत्सवाचा सामना कसे करतील असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
हे ही वाचा:
अर्णब गोस्वामीप्रमाणे बंगालमध्येही पत्रकाराची मुस्कटदाबी?
उद्धव ठाकरेंना दोन वर्षांपूर्वीच जनतेने गेट आउट केलंय !
इंडिगो विमानात कागदाच्या तुकड्यावर लिहिली होती बॉम्बची धमकी !
धैर्य, मिहिका, ध्रुव, अनिरुद्ध, आणि रिसा फर्नांडिसची निवड
त्यात राज्याच्या विधानसभा निवडणूका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत, अशा वेळी राजकीय नेते,पुढारी, यांची गर्दीच्या गणेश मंडळामध्ये दहा दिवस रेलचेल असणार आहे, त्याचा ताण पोलीस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता आहे.
लालबाग, परळ, माटुंगा ,दादर, दक्षिण मुंबईतील गिरगाव, गिरगाव चौपाटी, हे ठिकाण गणेशोत्सव काळात सर्वात जास्त गर्दीचे ठिकाणे आहेत, हे परिसर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात त्यापैकी काळाचौकी, माटुंगा, भोईवाडा, आग्रीपाडा, व्ही.पी. रोड, एलटी मार्ग इत्यादी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत, त्याठिकाणी मुंबई बाहेरून तसेच मुंबईतील पश्चिम उपनगरातील पोलीस ठाण्यातील अधिकारी यांची बदली करण्यात आली आहे.
काही अधिकारी यांच्या मते बदल्या करण्यात आल्या त्याला विरोध नाही, मागील अनेक महिन्यापासून अधिकारी बदल्यांच्या प्रतीक्षेत होते, त्यावेळी बदल्या झाल्या असत्या तर नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीची माहिती तसेच ओळख पटविण्यासाठी थोडा वेळ मिळाला असता, किंवा या बदल्या गणेशोत्सवाच्या नंतर काढण्यात आल्या असत्या तरी चालले असते अशी चर्चा मुंबई पोलीस दलात सुरू आहे.
मुंबई पोलीस अधिकारी यांच्यासह सहाय्यक फौजदार (एएसआय) आणि पोलीस अंमलदार असे एकूण ७ हजार ९०० जणांच्या बदल्या देखील गणेशोत्सवाच्या काळात काढण्यात आलेल्या आहेत, पोलीस अंमलदार हा प्रत्येक पोलीस ठाण्याचा कणा असतो, त्याला आपल्या हद्दीची तसेच गुन्हेगारांची माहिती असते, बदली झालेल्या पोलीस अंमलदाराना गणेशोत्सवापूर्वी त्यांच्या बदलीच्या जागी सोडल्यास पोलीस ठाण्यांना मोठा फटका बसू शकतो असेही पोलीस दलात चर्चा सुरू आहे.