मॉडिफाईड सायलेन्सर ही बुलेटची ओळख आहे. मात्र या सायलेन्सच्या आवाजामुळे अक्षरशः कानठळ्या बसतात आणि ध्वनी प्रदूषण सुद्धा होते. बुलेट दुचाकीस्वार कंपनीने दिलेले सायलेन्सर काढून अनेकजण मॉडिफाईड सायलेन्सर टाकतात आणि याचाच त्रास इतरांना होतो. या सायलेन्सरला वाहतूक विभागाची परवानगी नाही. त्यामुळे मुंबई पोलिसांनी या सायलेन्सरवर चांगलीच कारवाई करत सायलेन्सरस्वारांना अद्दल घडवली आहे.
मा. श्री राजवर्धन पोलीस सहआयुक्त मुंबई यांनी आयोजित केलेल्या वाहतूक आढावा बैठकीमध्ये रस्ता सुरक्षा अभियान २०२२ च्या अनुषंगाने कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर व ध्वनी प्रदूषण करून जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई विशेष मोहीम राबवण्यात आली. सदर विशेष पथकाने रॉयल एनफिल्ड,पल्सर यासारख्या मोटार वाहनांनी मॉडिफाईड केलेले जवळपास शंभर मॉडिफाइड सायलेन्सर जप्त केले होते.
मोटार सायकल चालकांकडून विशेषतः रॉयल एनफिल्ड मोटारस्वारांकडून ध्वनी प्रदूषण करणारे, कर्णकर्कश आवाज करणारे मॉडिफाईड सायलेन्सर बसवले जातात. त्यामुळे ध्वनिप्रदूषण होऊन इतर लोकांच्या तसेच वयोवृद्ध नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे बांद्रा वाहतूक विभागाकरडून अशाप्रकारचे शंभर मॉडिफाईड सायलेन्सर एकत्र करून पोलिसांनी त्याच्यावर रोलर फिरवून त्याचा चक्काचूर केला आहे.
हे ही वाचा:
गायिका वैशाली भैसनेला जीवे मारण्याची धमकी
पालिकेच्या ई बस खरेदीत घोटाळ्याचा आरोप
पावनखिंडला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद
याप्रसंगी मा. पोलीस उप-आयुक्त, वाहतूक, मुंबई यांनी माहिती दिली की, मोटार सायकल चालकांकडून अशाप्रकारचे ध्वनी प्रदूषण करणारे मॉडिफाईड सायलेन्सर लावण्यास पायबंद व्हावा या दृष्टिकोनातून सदरची कारवाई करण्यात आलेली आहे.
यापुढे देखील कर्णकर्कश आवाज करणारे मॉडिफाईड सायलेन्सर लावणाऱ्या मोटार सायकलवर मोटार वाहन कायदा कलम १९८ अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सदरची कारवाई संपूर्ण मुंबई शहरांमध्ये परिणामकारक राबवण्यात येणार आहे.