‘हमारे बारह’च्या टीमला पोलिस संरक्षण

अभिनेते अन्नू कपूर यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

‘हमारे बारह’च्या टीमला पोलिस संरक्षण

‘हमारे बारह’ या चित्रपटाच्या कथेमुळे गेल्या काही दिवसांत खळबळ माजली आहे. एका मुस्लिम कुटुंबात कुटुंब नियोजनाचा पुरस्कार घेणाऱ्या नव्या पिढीवर या चित्रपटाचे कथानक बेतले आहे. मात्र या चित्रपटातील कलाकार व निर्मात्यांना सातत्याने धमक्या मिळत आहेत. पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोहोचल्यानंतर चित्रपटाच्या टीमला महाराष्ट्र पोलिसांनी सुरक्षा प्रदान केली आहे. याबाबत आभार मानण्यासाठी या चित्रपटाचे मुख्य कलाकार अन्नू कपूर आणि चित्रपट निर्मात्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

चित्रपटाची घोषणा झाल्यानंतरच अन्नू कपूर, राहुल बग्गा, परितोष त्रिपाठी आणि मनोज जोशी आदी अभिनेत्यांच्या अभिनयाने नटलेल्या या चित्रपटाला कट्टरवाद्यांनी लक्ष्य केले आहे. चित्रपटनिर्माते बिरेंद्र भगत आणि संजय नागपाल यांनी नुकताच एक व्हिडीओ जाहीर केला. त्यात त्यांनी बॉम्बची धमकी मिळाल्याने त्यांचा विमानप्रवास रद्द केल्याचे सांगण्यात आले. त्यांचा चित्रपट ‘हमारे बारह’च्या टीझरच्या रीलिजनंतर या धमक्या मिळत असल्याचा आरोप चित्रपटाच्या टीमने केला आहे.

‘आम्ही आमच्या चित्रपटासाठी दिल्ली-मुंबई असा हवाईप्रवास करत होतो. मात्र बॉम्बची धमकी मिळाल्याने आमचे विमान आपत्कालीन परिस्थितीत उतरवावे लागले,’ असे वीरेंद्र भगत यांनी सांगितले. पोलिस या घटनांचा तपास करत आहेत. अन्नू कपूर, अश्विनी काळसेकर, मनोज जोशी, अभिमन्यू सिंह, पार्थ समथान, राहुल बग्गा, परितोष त्रिपाठी, अदिती भटपहरी यांचा हा चित्रपट सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाचा कान चित्रपट महोत्सवात प्रिमीअर होणार असल्याचा दावाही केला होता. मात्र नंतर समजले की, हा चित्रपट तिथे फिल्म बाजारमध्ये दाखवण्यात आला.

हे ही वाचा:

“गडचिरोली-चिमूरची जागा हरल्यास राजकीय संन्यास घेणार”

लोकसभा २०२४: मुंबईतून पीयूष गोयल, राहुल शेवाळे आघाडीवर

क्रिकेट खेळताना तरुण मैदानावरच कोसळला!

कोल्हापुरात भरधाव कारने सहा जणांना उडवले! तिघे मृत

या चित्रपटाबाबत अन्नू कपूर यांनी अधिक माहिती दिली. ‘मी या चित्रपटात एका कुटुंबाचा प्रमुख आहे. या कुटुंबातील मुले या कुटुंबातील गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या जाचक नियमांविरोधात आवाज उठवतात. या चित्रपटाचा विषय आजच्या जमान्यासाठी आरसा आहे. या चित्रपटाला विरोध करणाऱ्यांनी आधी हा चित्रपट पहावा आणि मग तुम्ही तुमचे मत मांडा, अशी मी विनंती करतो,’ असे अन्नू कपूर म्हणाले.

Exit mobile version