मध्य प्रदेशातील मांडला जिल्ह्यात बुधवारी (२ एप्रिल) सकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या आहेत. यांच्यावर प्रत्येकी १४ लाख रुपयांचे बक्षीस होते. पोलिसांनी घटनास्थळावरून एक सेल्फ-लोडिंग रायफल (एसएलआर), एक सामान्य रायफल, एक वायरलेस सेट आणि दैनंदिन वापराच्या काही वस्तू जप्त करण्यात आल्या. यासह इतर नक्षलवाद्यांना शोधण्यासाठी मोहीम सुरू केली जात आहे.
पोलिस महासंचालक (डीजीपी) कैलाश मकवाना म्हणाले की, जिल्ह्यातील बिछिया पोलिस स्टेशन परिसरात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या काळात, माओवाद्यांच्या एमएमसी (मध्य प्रदेश-महाराष्ट्र-छत्तीसगड) झोनच्या केबी (कान्हा भोरमदेव) विभागाच्या भोरमदेव एरिया कमिटीच्या सदस्य असलेल्या दोन कुख्यात महिला नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले.
कान्हा राष्ट्रीय उद्यानातील मुंडीदादर-गनेरीदादर-परसाटोला वनक्षेत्रात माओवादी असल्याची गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. याचवेळी माओवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तरात दोन गणवेशधारी महिला माओवादी ठार झाल्या.
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांपैकी एकाची ओळख एसीएम (एरिया कमिटी सदस्य) ममता उर्फ रमाबाई अशी झाली आहे, ती महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील करोची पोलीस ठाण्याअंतर्गत मुरकुडी येथील रहिवासी आहे. तिच्याकडून एक रायफल जप्त करण्यात आली.
तर दुसऱ्या महिला नक्षलवादीचे नाव एसीएम प्रमिला उर्फ मासे मांडवी असे आहे. ती छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील चिंतलनार पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पालिगुढेम येथील रहिवासी होती. तिच्याकडून एक एसएलआर जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, दीड महिन्यात दोन चकमकीत सहा माओवादी मारले जाण्याची ही राज्यात पहिलीच वेळ आहे.
हे ही वाचा :
२०१० मध्ये लालूप्रसाद यादव वक्फ बोर्डसंबंधी काय म्हणाले होते? व्हिडीओ होतोय व्हायरल!
पत्राचाळीच्या पुनर्वसित इमारतीतील मूळ ६७२ रहिवाशांना मिळणार हक्काचे घर!
म्हणून सरकार ४०० पार हवे होते…
मातोश्रीवर वक्फ बोर्डाची करडी नजर पडेल तेव्हा बोला!
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, “मी सुरक्षा दलांचे त्यांच्या शौर्य आणि धाडसाबद्दल अभिनंदन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च २०२६ पर्यंत भारताला नक्षल समस्येपासून पूर्णपणे मुक्त करण्याच्या संकल्पाला हे यश निश्चितच चालना देईल. देश आणि मध्य प्रदेश लवकरच दहशतवाद, नक्षलवाद आणि अतिरेकीपणापासून पूर्णपणे मुक्त होणार आहे.