पावसाळा सुरू होताच शहरातील विविध महामार्गावरील खड्डे डोके वर काढतात. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षातील प्रतिनिधी आणि विविध सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून खड्ड्यांवरून राजकारण करताना दिसून येतात. ज्या दिवशी आंदोलन किंवा राजकीय नेत्यांच्या दौरा असेल त्या दिवशी संबंधित विभागाचे अधिकारी अथवा ठेकेदार खड्डे बुजवण्याचे आश्वासन देतात. मात्र, खड्ड्याचं साम्राज्य जैसे थे राहते. हेच वाहतूक पोलिसांना खटकलं म्हणूनच राजकारण गेलं खड्ड्यात म्हणत भिवंडी शहरातील विविध मार्गावरील खड्डे भरण्याचे काम वाहतूक पोलिसांनी सुरू केले आहे. प्रशासनाला वारंवार विनंती करूनही रस्त्यांवरील खड्डे बुजवत नसल्याने आज वाहतूक पोलिसांना रस्त्यावर उतरून खड्डे बुजवण्याची वेळ आली आहे.
भिवंडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने यांच्या म्हणण्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ते विकास महामंडळ एमएमआरडीए तसेच रस्त्या संदर्भात असलेल्या विभागांना पत्रव्यवहार करून गणपतीपूर्वी खड्डे बुजवण्याचे लेखी पत्र दिले होते. मात्र, त्यावर सर्वच शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष केल्याने आज रोजी सामाजिक बांधिलकी म्हणून वाहतूक पोलिसांनी भिवंडीत विविध मार्गावरील पडलेले खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे.
हे ही वाचा:
प्रसिद्ध चित्रकार देविदास पेशवे यांचे निधन
दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांत मुंबईतला जान मोहम्मद
आता रणवीरला सगळे म्हणणार, अलीबाग से आया है क्या!
मुंबईत ३३ हजार खड्डे बुजवल्यानंतरही रस्त्यांची चाळणच!
विशेष म्हणजे पोलीस अधिकारी मायने यांनी असेही सांगितले आहे की मुंबई नाशिक महामार्ग तसेच ठाणे ते भिवंडी, कशेळी ते अंजुर फाटा व मानकोली ते चिंचोटी-कामन रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. शिवाय वाहनांचे अपघात आणि नुकसान देखील या ठिकाणी होतात आणि त्याला सर्वस्वी जबाबदार नागरिक वाहतूक पोलिसांना जवाबदार ठरवतात.