मुंब्रा रेती बंदर येथे रेती उपसा करण्यात येणाऱ्या दोन बार्ज पैकी एका बार्जवर स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे. स्फोटकांमध्ये १६ जिलेटीन कांड्या आणि १७ डिटोनेटर चा समावेश आहे. जप्त करण्यात आलेली सर्व स्फोटके जिवंत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही सर्व स्फोटके मुंब्रा पोलिसांनी ताब्यात घेतली असून याप्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
मुंब्रा रेतीबंदर हे मृतदेह फेकण्यासाठी एक कुख्यात ठिकाण बनले असून येथे अवैधरित्या रेती उत्खननाचे काम देखील गेले अनेक वर्ष अविरतपणे सुरू आहे. याच ठिकाणी मनसुख हिरन याच्या शवासोबतच आत्तापर्यंत १६ मृतदेह देखील सापडले होते.
मुंब्रा रेती बंदर खाडीत मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेती उपसा सुरू असल्याची माहिती जिल्हा अधिकारी कार्यालय येथे प्राप्त झाल्यानंतर जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या पथक सोमवारी सकाळी या ठिकाणी दाखल झाले. यावेळी खाडीत दोन बार्ज अवैधरित्या रेती उपसा करीत असल्याचे आढळून आले.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरे हे केवळ मनोरंजन करणारे ‘विदूषक’ !
भारत, मध्य पूर्व आणि युरोपियन कनेक्टिव्हिटी कॉरिडॉरमधून चीनला तडाखा
शेवटी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन झाले भारतातून जस्ट आऊट
दरम्यान पथकाने दोन्ही बार्ज ताब्यात घेऊन बार्जची झडती घेतली असता एका बार्ज मध्ये जिवंत १६ जिलेटीन कांड्या आणि १७ डिटोनेटर मिळून आले. या पथकाने स्थानिक पोलिसांना याबाबत सूचना दिली. मुंब्रा पोलिसांनी ही स्फोटके ताब्यात घेऊन अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ही स्फोटके याठिकाणी कशासाठी आणण्यात आली होती याचा तपास सुरू असल्याचे पोलिसानी सांगितले.