आयपीएस अधिकारी संजय पांडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदाची सूत्र हाती घेताच मुंबई पोलीस दलातील सहायक फौजदारांना (एएसआय) होळीची भेट म्हणून पोलीस उपनिरीक्षक पदी बढती देण्यात येणार आहे. गुरुवारी प्रायोगिक तत्वावर दक्षिण प्रादेशिक विभागातील ४३ एएसआय यांना आयुक्तांच्या हस्ते होळीच्या दिवशी बढती मिळणार आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे राज्याचे प्रभारी पोलीस महासंचालक असतांना पांडे यांनी खात्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षा रद्द करून पोलीस शिपायांना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पदोन्नती देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता. हा प्रस्ताव राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आल्यानंतर त्याची अंमलबजावणी मुंबई पोलिस दलाकडून सुरू करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
राज्यात कोरोनाने घेतला हजारो मुलांचा जीव
जनरल बिपिन रावत यांच्या नावाने ‘चेअर ऑफ एक्सलन्स’
भगवंत मान यांनी घेतली पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ
गांधी कुटुंबाने आता काँग्रेसचे नेतृत्व सोडावे!
यापूर्वी पोलीस शिपायाला सहायक फौजदार पदोन्नती मिळत होती, आणि पोलीस शिपाई हा शेवटी सहायक फौजदार म्हणून निवृत्त होत असे. आता मात्र पोलिस शिपायाला फौजदार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पोलीस दलात ३०वर्षे सेवा देऊन सहाय्यक फौजदार झालेल्या पोलीस शिपायाला कुठलीही परीक्षा न देता फौजदार म्हणून पदोन्नती मिळणार आहे. गुरुवारी होळीच्या दिवशी याची अमल बजावणी मुंबई पोलीस दलाकडून करण्यात येणार आहे.
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या हस्ते मुंबईतील दक्षिण प्रादेशिक विभागातील ४३ सहायक फौजदारांना ‘ग्रेड फौजदारांना’ यापदावर पदोन्नती देण्यात येणार आहे. त्यानंतर सगळीकडे त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.