मराठा आंदोलक मनोज जरांगे हे शनिवारपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार होते. अशातच मनोज जरांगे यांना दणका बसला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. अंतरवली सराटी आणि आजूबाजूच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जरांगे यांना आंदोलन करण्यास परवानगी देऊ नये अशी विनंती केली होती. याची दखल घेत पोलिसांनी मनोज जरांगेंच्या उपोषणाला परवानगी नाकारली आहे.
सगे-सोयरे यांना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे हे उपोषणाला बसणार आहेत. त्यांनी यापूर्वीच उपोषणाला बसणार असल्याचं ठरवलं होतं. पण, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असल्याने त्यांना आंदोलन करता आलं नाही. त्यामुळे त्यांनी ८ जून रोजी उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं होतं.
हे ही वाचा:
विशालने विझवली मशाल, खर्गेंना दिले पाठिंब्याचे पत्र!
जेडीयूचा ‘एक राष्ट्र, एक मतदान’ आणि समान नागरी कायद्याला पाठिंबा!
निरपराध शेळीला मारण्यापेक्षा द्रमुक कार्यकर्त्यांनी माझ्याकडे यायला हवे होते !
विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून
मनोज जारांगे यांच्या गावानेच त्यांच्या उपोषणाला विरोध केला आहे. अंतरवली सराटी गावातील ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला विरोध केला असून जरांगेंच्या उपोषणामुळे गावात मोठी गर्दी होते, याशिवाय जातीय सलोखा बिघडतो. त्यामुळे त्यांना उपोषण करण्यापासून रोखावं अशी विनंती ग्रामस्थांनी ३ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं होतं. जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारींची दखल घेतली आहे. पोलिसांनीही मनोज जरांगे यांच्या उपोषणाला परवानगी नाकारली आहे. जातीय सलोखा आणि शाळा-रहदारीला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुलं आणि महिलांना त्रास होतो, असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं होतं की, गावातील जातीय सलोखा बिघडत असल्याने याला परवानगी देऊ नये. आता पोलिसांनी त्यांना उपोषणाला परवानगी नाकारली असली तरी मनोज जरांगे उपोषण घेण्यावर ठाम असल्याची माहिती मिळत आहे.