मुंबई पोलीस दलामध्ये खेळाडू म्हणून भरती झालेल्या कॉन्स्टेबल प्रियांका नौकुडकर यांची निवड लंडनमध्ये होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी झाली आहे. तसेच मुंबई ते गोवा हे अंतर रिले स्पर्धेत विक्रमी पार केल्याबद्दल नुकतीच त्यांच्या नावाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये करण्यात आली आहे. सध्या प्रियांका या विलेपार्ले पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. २००९ मध्ये त्या पोलीस सेवेत रुजू झाल्या होत्या.
प्रियांका या कोल्हापूरमधील गडहिंग्लज तालुक्यात शिवराज कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी शर्यतींमध्ये आणि इतर खेळांमध्ये अनेक बक्षिसे मिळवली आहेत. पोलीस दलात रुजू झाल्यावरही त्यांनी त्यांचा नियमित सराव आणि अविरत मेहनत चालू ठेवली. मुंबई मॅरेथॉनमध्ये मिळवलेल्या विजयामुळे प्रियांका यांची निवड पुढील वर्षी लंडन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रियांका यांनी आतापासूनच सराव सुरू केला आहे.
हे ही वाचा:
क्रूझवर पार्टीला परवानगी; मात्र रांगोळी, गरब्यावर बंदी
शाळेत जाणाऱ्या शिक्षकांनाच झाली शिक्षा!
ईडीसमोर हजर राहण्यासाठी भावना गवळींना हवे अजून १५ दिवस!
रावणाची भूमिका करणारे त्रिवेदी यांचे निधन
डिसेंबर २०२० मध्ये बॉम्बे रनिंग क्लबच्या वतीने मुंबई ते गोवा ही ५५७ किलोमीटरची रिले शर्यत घेण्यात आली होती. या स्पर्ध्येमध्ये प्रियांका आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ५५७ किलोमीटरचे अंतर ५२ तास ३० मिनिटांत पूर्ण केले. त्यांच्या या विक्रमाची नोंद नुकतीच ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये करण्यात आली. त्यांच्या या कामाची दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घेतली. मुंबईचे पोलीस सह- आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रियांका यांचे कौतुक केले. प्रियांका यांच्यावर सध्या सर्वच स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या आता लंडनमधील कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागले आहे.