बीड जिल्ह्यातील महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या प्रतिभा सांगळे यांनी ‘मिस महाराष्ट्र’चा किताब पटकावला आहे. पोलीस दलात कार्यरत असतानाच त्यांनी हा किताब पटकावला आहे. प्रतिभा सांगळे या मूळच्या आष्टी तालुक्यातील असून त्या २०१० पासून बीडच्या पोलीस दलात कार्यरत आहेत. सध्या त्या पोलीस मुख्यालयात महिला कॉन्स्टेबल म्हणून कर्तव्य बजावत आहेत.
शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या प्रतिभा यांना मागील अनेक वर्षांपासून एखाद्या सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती. त्यासाठी त्या प्रयत्न देखील करत होत्या. अखेर त्यांनी डिसेंबरच्या अखेरीस पुण्यात पार पडलेल्या स्पर्धेमध्ये फर्स्ट रनर अपचा किताब पटकावत ‘मिस महाराष्ट्र’ स्पर्धेत मजल मारली आणि या स्पर्धेचे जेतेपदही मिळवले. यापुढे ‘मिस इंडिया’, ‘मिस युनिव्हर्स’च्या स्पर्धेची तयारी पुढे सुरू ठेवली आहे.
पोलीस दलच नाही तर प्रतिभा यांनी कुस्तीचे मैदानही गाजवले आहे. त्यांना त्यांच्या आजोबांकडून कुस्ती खेळण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे त्या सांगतात. पोलीस दलामध्येही खेळाडू म्हणून त्या रुजू झाल्या. लहानपणीचे छंद, आवड जपायला हवी म्हणून सौंदर्य स्पर्धेकडे वळाल्याचे प्रतिभा यांनी सांगितले.
हे ही वाचा:
राज्यावर घोंगावतय ड्रोन हल्ल्याचे संकट
‘मुख्यमंत्रीजी, आम्ही आमच्या आरोग्याची काळजी घेतो, तुम्ही शाळा सुरू करा’
अभिनेता सिद्धार्थने सायनापुढे मान्य केला पराभव
‘बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. येथे मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. मी पालकांना आवाहन करु इच्छिते की मुलींचे शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय त्यांचे लग्न करु नका,’ असे प्रतिभा म्हणाल्या. तसेच मुलींचा बालविवाह केला जाऊ नये यासाठी जिल्ह्यात जनजागृती करणार असल्याचे प्रतिभा यांनी सांगितले आहे. प्रतिभा यांच्या यशानंतर पोलीस दलासह बीड जिल्ह्यात प्रतिभा सांगळे यांचे कौतुक होत आहे.