दिवाळी जवळ आल्याने बाजारात विविध प्रकारच्या आकाश कंदीलांची गर्दी दिसू लागली आहे. यावर्षीच्या दिवाळीला उडते कंदील सोडण्याचा बेत आखत असाल तर सावधान. मुंबईत १६ ऑक्टोबरपासून पुढील ३० दिवस उडत्या कंदीलाच्या (फ्लाइंग कंदील) वापरावर आणि विक्रीवर बंदी असणार आहे. यासंदर्भात शासन आदेश जारी करण्यात आला आहे.
या आदेशानुसार १४ नोव्हेंबरपर्यंत उडत्या कंदीलांच्या वापर, विक्री आणि साठवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. या उडत्या कंदीलांना चिनी कंदील असेही म्हणतात. आकाश कंदील वापरल्याने मानवी जीवन आणि सुरक्षितता धोक्यात येऊ शकते असे मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.
शहरातील असामाजिक घटकांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी कंदील उडवण्याच्या कामांवर त्याचा वापर, विक्री, साठवणूक यावर काही निर्बंध घालणे आवश्यक आहे. जो कोणी या आदेशाचे उल्लंघन करेल तो भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अंतर्गत शिक्षेस पात्र असेल असं आदेशात म्हटले आहे.
हे ही वाचा:
मुंबई, दिल्लीत दहशतवादविरोधी बैठक
इराणमधील महसा अमिनी प्रकरण जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराला अटक
ठाकरे गटाच्या मशालीवर ‘या’ पक्षाने केला दावा
उद्धव ठाकरेंच्या तीन नेत्यांवर गुन्हा दाखल
यासोबतच मुंबईत पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र (विनाकारण) एकत्र येण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, मुंबईतील शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याची माहिती त्यांना वेगवेगळ्या स्त्रोतांकडून मिळाली आहे. याशिवाय मानवी जीवित व मालमत्तेचे नुकसानही होऊ शकते असेही म्हटले आहे .