पाकिस्तानचे नापाक मनसुबे कधीही यशस्वी होऊ देणार नाही!

पंतप्रधानांचा पाकिस्तानला इशारा

पाकिस्तानचे नापाक मनसुबे कधीही यशस्वी होऊ देणार नाही!

कारगिल विजय दिवसाला आज २५ वर्षे पूर्ण झाली. २६ जुलै १९९९ मध्ये भारतीय सैन्याने कारगिल युद्धात पाकिस्तान सैन्याला धूळ चारत विजय प्राप्त केला होता. भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ आज देशभरात कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (२६ जुलै) लडाखच्या केंद्रशासित प्रदेशातील द्रास येथे पोहोचले. कारगिल विजय दिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी युद्ध स्मारकावर पोहोचून पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. पाकिस्तानचे नापाक मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत, असा थेट इशारा पंतप्रधान मोदींनी कारगिलवरून पाकिस्तानला दिला.

पंतप्रधान मोदींनी लडाखमधील ‘शिंकुन ला टनेल’ प्रकल्पाचेही पहिल्या स्फोटाने उद्घाटन केले. कारगिलमधील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी लोकांना संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, कारगिल विजय दिवस आपल्याला सांगतो की, ‘देशासाठी दिलेले बलिदान अमर आहेत’.
दिवस, महिने, वर्षे, दशके आणि शतकेही निघून जातात. परंतु, देशाच्या रक्षणासाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्यांची नावे अमर राहतात. कारगिलमध्ये आम्ही केवळ युद्धच जिंकले नाही तर ‘सत्य, संयम आणि सामर्थ्य’ याचं अप्रतिम उदाहरणही दिलं.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “माझं भाग्य आहे की कारगिल युद्धादरम्यान मी माझ्या सैनिकांमध्ये एक सामान्य देशवासी म्हणून सामील होतो. आज जेव्हा मी पुन्हा कारगिलच्या भूमीवर आलो आहे, तेव्हा त्या आठवणी माझ्या मनात ताज्या झाल्या आहेत. मला आठवत आहे की, आमच्या सैन्याने एवढी कठीण युद्ध मोहीम कशी पार पाडली, मी त्या हुतात्मांना सलाम करतो, ज्यांनी कारगिलमध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले सर्वोच्च बलिदान दिले.

पाकिस्तानवर निशाणा साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “कारगिलमध्ये आम्ही केवळ युद्ध जिंकले न्हवते, तर आम्ही ‘सत्य, संयम आणि शक्ती’चे अप्रतिम प्रदर्शन केले होते. तुम्हाला माहिती आहे की, भारत त्यावेळी शांततेसाठी प्रयत्न करत होता. बदल्यात पाकिस्तान पुन्हा एकदा आपला अविश्वासू चेहरा दाखवला, पंरतु सत्यासमोर असत्य आणि दहशतीचा पराभव झाला.”

शेजारील देशाच्या दहशतवादी कारवायांवर प्रकाश टाकत पंतप्रधान मोदी म्हणाले, पाकिस्तानने याआधी जे काही गैरकृत्य केले आहे, त्यासाठी पाकिस्तानला तसे भोगावे देखील लागले आहे. परंतु, पाकिस्तानने आपल्या इतिहासातून काहीही शिकलेले नाही. दहशतवादाच्या मदतीने, प्रॉक्सी वॉरच्या आधारे स्वत: ला संबंधित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. ते पुढे म्हणाले, मी आज अशा ठिकाणाहून बोलत आहे जिथे दहशतवादाचे सूत्रधार थेट ऐकू शकतात. मला या दहशतवादाच्या समर्थकांना सांगायचे आहे की, त्यांचे नापाक मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत.”

हे ही वाचा:

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध

खलिस्तानी खासदार अमरीपाल सिंगच्या समर्थनावरून काँगेसचे घुमजाव !

रशिया- युक्रेन युद्धाचे सावट ऑलिम्पिकवर; रशियाच्या सहभागावर बंदी!

अलिबागजवळ भरकटलेल्या जहाजातून १४ क्रू मेंबर्सची सुखरूप सुटका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुतेचे धोरण स्वीकारण्याबाबत बोलले. ते म्हणाले की, आमचे शूर जवान दहशतवादाला पूर्ण ताकदीने चिरडून टाकतील. शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. लडाख असो वा जम्मू-काश्मीर, भारत विकासासमोरील प्रत्येक आव्हानाला नक्कीच पराभूत करेल.

५ ऑगस्टला काही दिवसांनी कलम ३७० रद्द होऊन पाच वर्षे पूर्ण होतील. जम्मू-काश्मीर आज एका नव्या भविष्याविषयी बोलत आहे, मोठ्या स्वप्नांबद्दल बोलत आहे. G-२० सारख्या जागतिक शिखर परिषदेच्या महत्त्वाच्या बैठकांसाठी जम्मू आणि काश्मीरची ओळख आहे. पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटन क्षेत्रही वाढत आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. लडाखच्या विकासाबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज लडाखमध्येही विकासाचा नवा प्रवाह निर्माण झाला आहे. ‘शिंकुन ला बोगद्या’च्या बांधकामाला आज सुरुवात झाली आहे. याद्वारे लडाख वर्षभर, प्रत्येक हंगामात देशाशी जोडून राहील. हा बोगदा लडाखच्या विकासासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी नवीन शक्यतांचे नवीन मार्ग उघडले, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

Exit mobile version