पंतप्रधान, राष्ट्रपतींकडूनही सिंधूवर कौतुकाचा वर्षाव

पंतप्रधान, राष्ट्रपतींकडूनही सिंधूवर कौतुकाचा वर्षाव

पीव्ही सिंधूने रविवारी टोकियो ऑलिम्पिकमधील महिला एकेरीत कांस्य पदक जिंकून चीनची खेळाडू हि बिंग जिआओला सरळ गेममध्ये पराभूत करून इतिहास रचला. सिंधू ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनली आहे. सिंधूने सुरुवातीपासूनच या सामन्यावर वर्चस्व राखत देशासाठी पदक पटकावले. तिच्या या यशाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी अभिनंदन करून तिच्या खेळाचे कौतुक केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले, “पीव्ही सिंधूच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आम्ही सर्व उत्साहित आहोत. टोकियो २०२० मध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन. ती भारताची शान आहे आणि आमची सर्वात उत्कृष्ट ऑलिम्पियन आहे.”

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट केले, की “पीव्ही सिंधू दोन ऑलिम्पिक गेम्समध्ये पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. तिने सातत्य, समर्पण आणि उत्कृष्टतेचा एक नवीन मापदंड प्रस्थापित केला. भारताला अभिमान मिळवून दिल्याबद्दल मी तिचे हार्दिक अभिनंदन करतो.”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट केले, की “पीव्ही सिंधू खूप छान खेळली. तुम्ही खेळाप्रती तुमची अतुलनीय बांधिलकी आणि समर्पण वारंवार सिद्ध केले आहे. तुम्ही राष्ट्राचा गौरव करत राहा. आम्हाला तुमच्या उल्लेखनीय कामगिरीचा अभिमान आहे.”

जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने मुसाहिनो फॉरेस्ट स्पोर्ट्स प्लाझा येथे ५३ मिनिटे चाललेल्या सामन्यात चीनची खेळाडू बिंग जिओचा २१-१३, २१-१५ असा पराभव केला. सिंधूला उपांत्य फेरीत चायनीज तैपेईच्या ताइ जू यिंगकडून १८-२१, १२-२१ असे पराभूत व्हावे लागले होते. मात्र, त्याने कांस्यपदकासह आपला ऑलिम्पिक प्रवास पूर्ण केला आहे.

Exit mobile version